-शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील
मेल्विन जोन्स (Melvin Jones) यांनी ७ जून १९१७ रोजी लायन्स क्लब इंटरनॅशनल (Lions Clubs International) ची स्थापना केली. ही एक जागतिक स्वयंसेवी संस्था आहे, जी सामाजिक सेवेसाठी कार्य करते. या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे दृष्टिहीन आणि दुर्बल दृष्टी असलेल्यांसाठी सेवा करणे, तसेच शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, युवा, महिला विकास यांसारख्या क्षेत्रात कार्य करणे.
मेल्विन जोन्सच्या मते, "A man’s worth is not measured by what he gets, but by what he gives." (माणसाची किंमत त्याने काय मिळवले यावर नाही, तर काय दिले यावर मोजली जाते.)
त्यानुसार लायन्स क्लब तर्फे दृष्टी सेवा (SightFirst) नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्म्यांचे वाटप, दुर्घटनाग्रस्त व नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत, शाळा, वाचनालये, शिष्यवृत्त्या, युवक व किशोरवयीन मुलांसाठी नेतृत्व विकास, आरोग्य शिबिरे व रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीमा, अन्नधान्य वाटप आदी उपक्रम राबविले जातात.
“We Serve" (आम्ही सेवा करतो) हा लायन्स क्लबचा मोटो (Motto) आहे. लायन्स क्लब जगभरात २०० पेक्षा अधिक देशांत कार्यरत असून १४ लाखांहून अधिक सदस्य आहेत. सफाळे लायन्स क्लब हा डिस्ट्रिक्ट 3231 A3 मध्ये येतो. या क्लब तर्फे वर्षभरामध्ये वृक्षारोपण, वृक्षदिंडी, वैद्यकीय शिबिर, रोड सेफ्टी अवेअरनेस अँड हेल्मेट डिस्ट्रीब्यूशन, दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा, गोड दिवाळी आदी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. विशेषतः यावर्षी क्लब तर्फे पालघर जिल्ह्यातील पहिली आणि राज्यातील दुसरी हिल मॅरेथॉन आयोजित करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
विविध समाज उपयोगी उपक्रम राबविताना त्यांना योग्य दिशा मिळावी म्हणून वर्षभरात क्लब तर्फे एक डोमेस्टिक आणि एक इंटरनॅशनल टूरचे आयोजन केले जाते. गेल्या वर्षी डोमेस्टिक टूर स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे इंटरनॅशनल टूर श्रीलंका येथे गेली होती. तर यावर्षी डोमेस्टिक टूर शेगाव- लोणार येथे तर इंटरनॅशनल टूर व्हिएतनाम येथे आयोजित केली होती.
व्हिएतनाम हा दक्षिणपूर्व आशियातील एक महत्त्वाचा देश आहे. ह नोई ही व्हितनामाची राजधानी आहे. या राजधानी बरोबरच हो ची मिन्ह सिटी, द नांग ही व्हिएतनामची प्रमुख शहरे आहेत. सफाळे लायन्स क्लबच्या ३० सदस्यांनी आठ दिवसांच्या या अभ्यास दौऱ्यामध्ये व्हिएतनामच्या प्रथम हो ची मिन्ह सिटी (Ho Chi Minh City) शहरापासून अभ्यास दौऱ्याला सुरुवात केली. पूर्वी सायगॉन म्हणून ओळखले जाणारे, हो ची मिन्ह सिटी व्हिएतनामचे सर्वात मोठे आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. हे शहर दक्षिण व्हिएतनामचे सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. या शहरालाच सायगॉन हे नाव १९७५ पर्यंत वापरले जात होते. मात्र व्हिएतनाम आणि अमेरिका युद्धाच्या समाप्तीनंतर शहराचे नाव बदलून हो ची मिन्ह सिटी करण्यात आले. फ्रेंच वसाहती काळात हे शहर फ्रेंच कोचीनचिनाचे राजधानी होते.
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून आम्ही थेट व्हिएतनामच्या हो ची मिन्ह सिटीमध्ये असलेल्या तान सॉन न्हाट आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश केला. नेहमीप्रमाणे एअरपोर्टवर आमचे स्वागत करण्यासाठी येथील गाईड लायन्स क्लब चा बोर्ड हातात घेऊन उभा होता. आम्ही सकाळी सातच्या सुमारास एअरपोर्टवर उतरल्यानंतर लगेचच आमच्या सिटी टूरला सुरुवात झाली.
व्हिएतनाम हा तसा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला देश. येथील विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर आपल्या मुंबई शहरात खड्ड्यांचा शोध घेण्यास सरावलेल्या नजरेचा पचका होतो. स्वच्छ आणि गुळगुळीत रस्त्यावर आखलेले वाहतूक नियंत्रणाचे आखीव रेखीव पांढरे पट्टे व पद पथावरील रंगी बेरंगी मार्गिका आपल्याला सुरक्षित ठिकाणी पोहचवतात. प्रथमतः आम्ही ऐतिहासिक संदर्भ असलेल्या ठिकाणाला भेट दिली. व्हिएतनाम आणि अमेरिका या दोन देशांमध्ये सुमारे वीस वर्षे चाललेल्या युद्धात अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामने पराभूत केले होते. गोरिला वॉर च्या अर्थातच आपल्या गनिमी काव्याच्या माध्यमातून व्हिएतनामने कशा पद्धतीने अमेरिकेला पराभूत केले हे तेथील गाईडने सांगितले. काही महत्त्वाचे युद्धातील स्पॉट, युद्धातील हत्यारे बघितली. हे शहर व्हिएतनामच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य केंद्र मानले जाते. ज्यामध्ये सेवा, उद्योग, बांधकाम आणि पर्यटन यांचा समावेश आहे. सायगॉन पोर्ट यांसारखी वाहतूक केंद्रे शहराच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. दोन दिवसांच्या वास्तव्यामध्ये या शहरातील अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळे पाहिली. जसे की इंडिपेंडन्स पॅलेस, सायगॉन ऑपेरा हाऊस, नोट्रे डेम कॅथेड्रल. येथील प्रसिद्ध असलेल्या बेन थान मार्केट मध्ये शॉपिंग केली. मुंबईतील मार्केट प्रमाणे हे मार्केट शॉपिंग साठी छान आहे. मात्र येथे मोठ्या प्रमाणात बार्गेनिंग केली जाते. येथे डॉलर किंवा व्हिएतनामचे चलन डॉन्ग चलनाचाच अधिक वापर होतो. काही तुरळक ठिकाणी भारतीय चलन घेतले जाते. येथील रस्त्यांवरील खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत.
त्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही आमचा मोर्चा द नांग (Da Nang)कडे वळविला. होची मीन ते दनांग हा प्रवास डोमेस्टिक फ्लाईटने केला. साधारणपणे एक तास वीस मिनिटांचा हा फ्लाईटचा प्रवास होता. या प्रवासात दरम्यान माझ्या बॅगेची ट्रॉली तुटल्याने आम्ही एअरपोर्टवर तक्रार केली. फक्त दहा मिनिटांमध्ये आम्हाला बॅगेच्या नुकसान पोटी दीड लाख व्हिएतनाम डॉन्ग देण्यात आले. डा नांग हे व्हिएतनामच्या मध्य भागातील एक महत्त्वाचे बंदर शहर आहे, जे आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या उत्तरेस अनामाईट पर्वतरांगांमुळे हे शहर नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. फ्रेंच वसाहती काळात डा नांग हे एक महत्त्वाचे बंदर होते. माय खे बीच येथे बोटिंग केली. सोन त्रा द्वीपकल्प, आणि न्गू हान (मार्बल) पर्वत ही द नांगमधील प्रमुख पर्यटन स्थळे पाहिली.
संपूर्ण एक दिवसाची आमची सफर येथील प्रसिद्ध असलेल्या बाणा हिल्स (Ba Na Hills) या लोकप्रिय पर्यटन स्थळावर गेली. हे डॅनँग (Da Nang) शहराजवळ, समुद्रसपाटीपासून सुमारे १,४८७ मीटर उंचीवर वसलेले आहे.बाणा हिल्सचे वैशिष्ट्ये म्हणजे गोल्डन ब्रिज (Golden Bridge) "हातात धरलेला पूल" हे बाणा हिल्सचे सर्वात प्रसिद्ध आकर्षण! दोन विशाल दगडी हातांनी धरलेला हा सोनेरी पूल उंच डोंगराच्या टोकावरून जातो. हा पूल सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे. येथे फोटो काढण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. विशेषतः या डोंगरावर जाण्यासाठी जगातील सर्वात लांब व उच्चतेवरून जाणारा केबल कार राईड आहे. साधारणतः केबल कारला पाच किलोमीटर अंतर १७ मिनिटांमध्ये कापावे लागते. हा प्रवास निसर्गरम्य डोंगररांगा, जंगल आणि धबधब्यांमधून जातो. संपूर्ण डोंगरावर केबलकारच फिरताना दिसतात. हा अनुभव रोमांचक आणि अत्यंत नयनरम्य असा आम्हाला वाटला. व्हिएतनाम देशावर फ्रेंच लोकांनी काही वर्षे राज्य केले. बाणा हिल्समध्ये एक युरोपियन शैलीतील फ्रेंच गाव उभारले आहे. येथे गॉथिक चर्चेस, शाही इमारती, फाउंटन आणि रस्त्यावर कॅफे असलेले वातावरण मनाला भुरळ पाडणारे आहे. तेथे प्रत्येकाला आपला फोटो क्लिक करावा असे वाटते. फोटोसाठी हे ठिकाण स्वर्गासारखे आहे. येथे असलेल्या बौद्ध मंदिरं आणि पॅगोडाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही ॲडव्हेंचर व थीम पार्क येथे गेलो. येथे सर्वांनी रोलर कोस्टर्स, गेम्स, आणि अॅडव्हेंचर राईड्स वर मजा लुटली. बाणा हिल्स हे ठिकाण आपल्याला युरोप आणि आशियाच्या संगमाचा अनुभव देते. निसर्ग, आर्किटेक्चर, साहस, धार्मिकता आणि आनंद हे सर्व काही एकत्र आपल्याला येथे अनुभवता येते.
शहरातील कॅफे, रेस्टॉरंट्स आणि बार्समुळे येथे पर्यटकांची गर्दी होती. या शहरात चाम संग्रहालय आहे, जे चाम संस्कृतीशी संबंधित अनेक वस्तूंचे प्रदर्शन करते. तसेच, दरवर्षी आयोजित आंतरराष्ट्रीय फटाक्यांच्या स्पर्धेमुळे डा नांग विशेष ओळखले जाते.
आमच्या टूरच्या पुढचे दोन दिवस हे ह नोई (Hanoi) या व्हिएतनामच्या राजधानी शहरात होते. हो नाई हे डोंग नाई प्रांतातील एक क्षेत्र आहे, जे हो ची मिन्ह सिटीच्या पूर्वेला आहे. ह नोई हे औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित झाले आहे, जिथे अनेक कारखाने आणि उद्योग स्थापन झाले आहेत. येथे स्थानिक बाजारपेठा आणि पारंपरिक व्हिएतनामी जीवनशैली अनुभवता आली.
ह नोई (Hanoi) येथील हो ची मीन महाल (Ho Chi Minh Mausoleum) हे व्हिएतनामचे महान नेते हो ची मीन यांचे स्मारक बघितले. येथे त्यांचे शव संरक्षित ठेवलेले आहे. होजी मीन संग्रहालय हे त्यांचा जीवनप्रवास व विचारांवर आधारित संग्रहालय आहे. लोटस फुलाच्या आकारात बदलेले बौद्ध मंदिर म्हणजेच वन पिलर पॅगोडा होय. हनोई ओल्ड क्वार्टर (Old Quarter) येथे आपल्याला पारंपरिक व्हिएतनामी दुकाने, रस्त्यांवरील स्ट्रीट फूड आणि बाजारपेठा पाहायला मिळतात. येथे आमच्यापैकी बऱ्याच जणांनी मोठ्या प्रमाणात शॉपिंग केली. होन किआम लेक (Hoan Kiem Lake) हे शहराच्या मध्यभागी असलेले एक सुंदर तलाव आहे. याच्या मधोमध "Ngoc Son Temple" आहे. येथे बोटिंग उपलब्ध आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही येथे बोटिंग करून कागदी दिवे पाण्यात सोडले.टेम्पल ऑफ लिटरेचर (Temple of Literature)हे व्हिएतनाममधील पहिले विद्यापीठ. कनफ्युशियस या तत्त्वज्ञानावर आधारित मंदिर आहे. हनोई ओपेरा हाऊस (Hanoi Opera House)हा फ्रेंच आर्किटेक्चरचा उत्कृष्ट नमुना असून सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीतातील एक प्रमुख केंद्र आहे. ट्रान क्वोक पॅगोडा (Tran Quoc Pagoda) वेस्ट लेक (West Lake) जवळ वसलेले हे एक अतिशय सुंदर व प्राचीन बौद्ध मंदिर आहे.नाइट मार्केट्स आणि स्ट्रीट फूड टूर हे स्थानिक पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी आणि खरेदीसाठी पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण आहे.
हा लॉंग बे हे व्हिएतनाममधील एक अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे उत्तर व्हिएतनाममधील क्वांग निन्ह (Quang Ninh) प्रांतात असून हनोईपासून सुमारे १७० किमी अंतरावर आहे. येथील क्रूज वर आम्ही दिवसभर आनंद लुटला. लॉंग बे हे युनेस्कोने घोषित केलेले जागतिक वारसा स्थळ (UNESCO World Heritage Site) आहे. या ठिकाणी सुमारे १,६०० पेक्षा जास्त चुना दगडाचे (limestone) बेटं आहेत, जी समुद्रातून उभी दिसतात.काही बेटांवर गुहा, नैसर्गिक खडकांच्या कमानी आणि हिरवेगार जंगल आहेत. तेथील Sung Sot Cave (Surprise Cave) ही एक भव्य व आकर्षक गुहा आहे. सुमारे ८०० ते १००० पायऱ्या चढून या गुहेमध्ये प्रवेश मिळतो. आमच्या तीस सदस्यांपैकी फक्त आम्ही नऊ सदस्यांनी या गुहेमध्ये प्रवेश केला. येथील इंटेरियर मनाला भुरळ पाडणारे आहे. गुहा खूपच मोठी आहे. Top Island हा येथे छोटं सुंदर समुद्रकिनारा आणि टेहळणी पॉइंट आहे. दिवसभराच्या क्रूझ टूरमध्ये बेटांची सफर, कयाकिंग, स्विमिंग, आणि सी फूड दुपारच्या जेवणाचा आनंद लुटला.
या तीन शहरांमध्ये व्हिएतनामच्या विविध पैलूंचे दर्शन घडते, ज्यामुळे पर्यटक आणि अभ्यासक दोघांसाठीही ही स्थळे महत्त्वाची आहेत. व्हिएतनामची शिक्षण प्रणाली एक ठराविक शिस्तबद्ध पद्धतीने रचलेली असून, ती प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण या तीन टप्प्यांमध्ये विभागली आहे. व्हिएतनाममध्ये शिक्षक हे केवळ ज्ञानदान करणारे नाहीत, तर सामाजिक आणि नैतिक मार्गदर्शक मानले जातात. त्यांना समाजात मोठा सन्मान दिला जातो.सरकार शिक्षण क्षेत्रावर भर देत असले तरी, काही भागांमध्ये आर्थिक अडचणी आणि ग्रामीण-शहरी शिक्षणातील असमानता यांसारखी आव्हाने अद्याप आहेत. येथील पर्यटन व्यवसाय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा मानला जातो.
या अभ्यास दौऱ्यामुळे व्हिएतनाममधील ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक पैलूंचा समृद्ध अनुभव मिळाला. विविध शहरे, तिथली जीवनशैली, युद्धाची पार्श्वभूमी, पर्यटन स्थळे यांचे प्रत्यक्ष निरीक्षण केल्याने सहभागी सदस्यांचा दृष्टीकोन अधिक व्यापक झाला. लायन्स क्लबच्या सेवाभावी कार्याला ही टूर प्रेरणा देणारी आणि मार्गदर्शक ठरेल असा आम्हाला विश्वास आहे. आमचा आठ दिवसांचा व्हिएतनाम चा प्रवास सुखकर आणि आनंददायी करण्यासाठी वीणा वर्ल्डस चे टूर व्यवस्थापक अक्षय गायकवाड यांचा मोलाचा वाटा होता.
~ प्रमोद भालचंद्र पाटील
अध्यक्ष,लायन्स क्लब ऑफ सफाळे तथा
शिक्षण अभ्यासक,
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक
With Warm Regards
Comments
Post a Comment