समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------
शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.
खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.
सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.
पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्थिक मदत झाली आहे. जिल्ह्यातील शिक्षक वर्गाने याकामी पुढाकार घेऊन एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. पालघरमधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक या समाजमाध्यमाच्या समुहाने पालघर मधील एका दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या शिक्षकांच्या पत्नीला ही आर्थिक मदत केली.
पालघर येथील सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात विनाअनुदान तत्त्वावर सेवेत असलेल्या एका शिक्षकाच्या पत्नीला हिमोग्लोबिनविषयक दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना महागडे उपचार घ्यावे लागत होते. सदर शिक्षकाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांने सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाची दखल घेत गुरुकुल शिक्षक समूहातील शिक्षकांनी तब्बल १ लाख ३६ हजार ५५ रुपये जमा करून ते संबंधितांना देण्यात आले.विशेष बाब म्हणजे सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रार्थनेने सदर रुग्णाने या दुर्धर आजारावर मात करून त्या आता घरी पोचल्या आहेत.
खाऊच्या पैश्यातून गुरुकुल आपत्कालीन निधीत विद्यार्थ्यांचेही योगदान ......
गुरुकुल आपत्कालीन निधीमध्ये शिक्षकाच्या पत्नीच्या आजारासाठी शिक्षकांबरोबरच शिक्षण प्रेमी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा हातभार लावला आहे.
पालघर तालुक्यातील विराथन बुद्रुक येथील मेघराज शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्यालयातील इयत्ता दहावीच्या (ब ) विद्यार्थ्यांनी आपल्याला खाऊ साठी दिलेल्या पैशातून स्व- इच्छेने निधी जमा करून आपल्यामध्ये असलेल्या संवेदनशीलता, दातृत्वपणा, सौजन्यता या गुणांचे उत्तम दर्शन घडविले आहे. इयत्ता दहावीच्या ब च्या वर्गातून शिक्षकांच्या पत्नीच्या खर्चासाठी निधी उभारून विद्यार्थ्यांनी शिक्षकां प्रति असलेल्या संवेदनशीलतेचे उत्तम दर्शन घडविले आहे.
शेवटी असं वाटतं...
"माणसांमधली माणूसकी माणसांनीच जपली जावी
आप-आपसातील आत्मीयता आपुलकीने टिकली जावी
आलेल्या प्रत्येक संकटावर सहकार्यानं मात पाहिजे माणसांकडून माणसांसाठी मदतीचा सदैव हात पाहिजे."
गुरुकुल आपत्कालीन निधी समितीचे प्रमोद पाटील, डेरेल डिमेलो, संजय पाटील, विलास पाटील, रवींद्र नाईक, राम पाटील, राजेंद्र पाटील, निलेश भोईर, नरेंद्र घरत, नामदेव कवळे आदींच्या पुढाकाराने हा निधी जमविण्यात आला.
पालघर जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांनी एकत्रित येऊन गुरुकुलचे तीन व्हाट्सअप समुह व एक फेसबुक पेज समुह निर्माण केलं आहे. समूहाच्या माध्यमातून दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शिक्षकांसाठी काव्यगायन, निबंध स्पर्धाचे आयोजन करणे, समाजोपयोगी कार्यक्रम आदी विविध उपक्रम सुरू असतात. आजच्या डिजिटल युगामध्ये समाज माध्यमे संपूर्ण जगातील सर्वात मोठे संप्रेषणाचे माध्यम बनली आहेत. किंबहुना ही माध्यमे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. याच माध्यमांचा सकारात्मक वापर करून पालघर मधील गुरुकुल समुहाने समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
गुरुकुल समुहाचा मदतीचा हात...
गुरुकुल समुहाने याआधी सांगली, कोल्हापूर येथे ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुराने अतोनात नुकसान झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला १ लाख ६ हजार २२२ रुपये शैक्षणिक मदत केली होती. जून २०१६ मध्ये औरंगाबाद येथे शिक्षक चळवळीत बळी पडलेल्या जालना येथील जाफराबाद विद्यालयातील गजानन खरात या शिक्षकाच्या कुटुंबाला समूहातर्फे ५५ हजार ५५५ रुपयांची रोख रक्कम जालना येथे जाऊन केली होती. भविष्यात ही अशी एखादी घटना घडल्यास गुरुकुल समूहाचा मदतीचा हात सदैव पुढे राहील असे गुरुकुल समूहाच्या वतीने सांगण्यात आले.
शिक्षकांच्या कलागुणांना वाव....
शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी समूहाच्या माध्यमातून शिक्षकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. कोरोना च्या काळामध्ये निबंध स्पर्धा, काव्य गायन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समूहा मधील कला शिक्षकांनी कोरोना लॉकडाऊन मध्ये विविध पोस्टर्स, व्यंगचित्रे, लेखांद्वारे जनजागृती करण्याचे मोलाची कामगिरी केली आहे.
आज शिक्षणामध्ये सोशल मीडिया महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेतच. लोक सोशल मीडियावर बराच वेळ घालवतात, ज्यामुळे ते कोठेतरी त्यांच्या प्रियजनांपासून दूर जातात हेही सत्य आहे. सोशल मीडियाच्या आकर्षणाच्या पार्श्वभूमीवर तरुण आणि मुले त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास असमर्थ बनतात अशीही ओरड पालकांकडून केली जात आहे. मात्र गुरुकुल समूहाने सोशल मीडियाचा उपयोग लोकांमध्ये सामाजिक जाण निर्माण करून विविध विषयांबद्दल जनजागृती करण्यासाठी केला तर निश्चितच चांगलेच आहे याचा प्रत्यय आणून दिला आहे. सोशल मीडियामुळे मुले खेळात कमी रस घेत आहेत, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. बरेच लोक सोशल मीडियाचा गैरवापर करतात. आपण अशा गोष्टींबाबत सावध राहणे गरजेचेच आहे. जर सोशल मीडियाचा योग्य हेतूने वापर केला गेला तर ते नक्कीच वरदानापेक्षा काही कमी नाही. आपल्या देशातील तरुण सर्वाधिक सोशल मीडियावर सक्रिय राहतात. याचा त्यांच्या भविष्यावर परिणाम होत आहे. सोशल मीडियाद्वारे हॅकिंग, पासवर्ड चोरी करणे यासारख्या चुकीच्या गोष्टीं सुद्धा होत आहेत, हे सुद्धा नाकारता येत नाही. मात्र गुरुकुल च्या माध्यमातून सुरू असलेले सर्व उपक्रम निश्चितच सर्वांना प्रेरणादायी आहेत.
कोरोनाच्या महा आपत्तीत सुद्धा कार्य सुरूच...
कोरोनाच्या आपत्तीमुळे एक-दीड वर्षे राज्यातील शाळा- महाविद्यालये बंद होती . मुलांचे शिक्षण मोबाईल अथवा लॅपटॉप वर सुरू होते. या अनुषंगाने गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समूह आणि माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने १ एप्रिल ते १५ एप्रिल २०२१ या दरम्यान सतत पंधरा दिवस गुरुकुल व्याख्यानमाला इयत्ता दहावी आणि बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. पालघर जिल्ह्यातील २० तज्ञ विषय शिक्षक आणि राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील १० तज्ञ विषय शिक्षक अशा एकूण ३० तज्ञ मार्गदर्शकांनी या व्याख्यान माले मध्ये दररोज दोन ते अडीच तास त्या त्या विषयाचे मार्गदर्शन विद्यार्थी आणि शिक्षकांना केले. ग्रामीण आणि दुर्गम भागात नेटवर्कची समस्या लक्षात घेऊन झूम बरोबरच युट्युब वर ही व्याख्यानमाला घेण्यात आली. ज्या विद्यार्थी वा शिक्षकांना नेटवर्क चा प्रॉब्लेम असेल तर असे विद्यार्थी किंवा शिक्षक त्यांच्या सोयीनुसार ही व्याख्यानमाला युट्युब वर बघू शकले. या व्याख्यानमालेचा सुमारे ३५ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या व्याख्यानमालेचे विशेष म्हणजे व्याख्यानमालेच्या सुरुवातीला दररोज शिक्षण क्षेत्रातील अधिकारी वर्गाने विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढविला. ही व्याख्यानमाला राज्यातील आदर्शवत व्याख्यानमाला म्हणून संबोधली जाते. ई-बुकच्या माध्यमातून एकाच क्लिकवर ही व्याख्यानमाला विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत पोचवण्याचं काम गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाने केलं आहे.
- प्रमोद भालचंद्र पाटील,M.A.B.Ed.,D.S.M.
ॲडमिन
गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुह
तथा
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक
-9049052555
Comments
Post a Comment