बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर...
अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.
आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रूपांतर अद्वितीय अशा आनंदात झालं. आमच्या मुक्ताई परिवारातील १९ जणांनी काश्मीरमध्ये अक्षरशः १० दिवस मनमुराद असा आनंद लुटला.
भारताच्या नकाशामध्ये मुकुटाप्रमाणे असलेला काश्मीर हा जणु पृथ्वीवरील स्वर्गच म्हणावा लागेल. दहा दिवसांच्या काश्मीर टूर साठी आम्ही ११ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता पालघर सोडले. मुंबई विमानतळावरून १०:४० वाजता सुटणारे फ्लाईट सुमारे १२:३० वाजता सुटले. मुंबई विमानतळ ते जम्मू विमानतळ हा प्रवास अत्यंत सुखकर झाला. बच्चे कंपनीने विशेष आनंद घेतला. तदनंतर जम्मू विमानतळावरून श्रीनगर विमानतळावर जाण्यासाठी दुसऱ्या फ्लाईटने जावे लागले. साधारणपणे सहा वाजण्याच्या सुमारास श्रीनगर येथे पोहोचलो. श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये फ्रेश झाल्यानंतर तेथील मार्केट आणि शिकाऱ्याला भेट दिली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ एप्रिल रोजी श्रीनगर येथे डोंगरावर पुरातन असलेल्या शंकराचार्य मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले. हे मंदिर उंच डोंगरावर असून मंदिरापर्यंत जाण्यासाठी उत्तम पायऱ्या आहेत. या मंदिरा जवळून श्रीनगर आणि आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसराचे विलोभनीय असे दर्शन घडते. मंदिरात दर्शन झाल्यानंतर आशिया खंडातील अत्यंत मोठी आणि प्रसिद्ध असलेल्या नयनरम्य टूलीप गार्डनला भेट देण्याचा योग आला. ही गार्डन वर्षातून फक्त एप्रिल महिन्यामध्येच सुरू असते. या गार्डनमध्ये रंगीबेरंगी सुमारे ६० हजारांपेक्षा अधिक वेगवेगळ्या जातीच्या फुलांचा नजरांना बघतांना झालेल्या आनंदाचे वर्णन शब्दात करणे कठीणच. येथे मनमुराद फोटो काढून येथील स्मृती मोबाईलच्या कॅमेरात कैद केल्या. दुपारी एकच्या दरम्यान हॉटेलमध्ये दुपारच्या जेवणाचा स्वाद घेऊन दुपारनंतर मुघल गार्डन येथे काश्मीरी पद्धतीचे पोशाख परिधान करून काश्मिरी असल्याचा आनंद लुटला. त्यानंतर ऐतिहासिक असलेल्या परि महल येथे भेट देऊन अत्यंत शुद्ध पाण्याचे झरे असलेल्या चष्मेशाही गार्डन येथे गेलो. चष्मेषाही येथे शुद्ध पाण्याचा झरा असून येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या पाण्याची चव घेतली होती असे म्हटले जाते. आमच्यापैकी काहींनी येथील शुद्ध झऱ्याच्या पाण्याची चव घेतली. त्यानंतर संध्याकाळी येथील शिकाऱ्यामध्ये फेरफटका मारला. शिकारा म्हणजे दल लेक येथे असलेल्या बोटींमधून फिरणे. येथे मोठ्या प्रमाणात लहान- मोठ्या बोटी अर्थात शिकारा आपल्याला पाहायला मिळतात. श्रीनगर मध्ये शिकारामध्ये फिरतांना आणि अत्यंत थंड वातावरणात घेतलेल्या कावाची चव जिभेवरच राहून गेली.कावा म्हणजे गरम पाण्यात विविध वनस्पती, ड्राय फ्रुटस टाकून बनवलेले चहासारखे पेय. शिकाऱ्यात बसून तेथील लोक जीवन पाहिल्यानंतर मिना बाजारा मध्ये शॉपिंग करतांना खूपच मजा आली.
पर्यटनाचा तिसरा दिवस अर्थातच १३ एप्रिल. सकाळी लवकरात लवकर उठून आम्ही श्रीनगर पासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनमर्ग कडे प्रयाण केले. डोंगरदऱ्या आणि नागमोडी वळणा बरोबरच प्रवासामध्ये उंचच उंच गेलेले सिल्वर ओक, डोंगरावर बर्फाची छान अंथरलेली शुभ्र पांढरी चादर पाहतांना आनंद गगनात मावेना असाच होता. साधारणपणे सकाळी अकराच्या सुमारास सोनमर्गला पोहोचल्यानंतर सोनमर्ग येथील बर्फाच्छादित भागात जाण्यासाठी हात मोजे,जॅकेट घालून आतापर्यंत पायात न घातलेले गम बूट घातले. तसेच येथील बर्फावर चालणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या मोटार गाड्यांवर स्वार होऊन उंच अशा बर्फाच्छादित भागात गेलो. आमच्यासोबत सहा वर्षांच्या मुलांपासून ६५ वर्षांच्या वयस्कर व्यक्ती असल्याने काही गोष्टींची आम्हाला काळजी घेणं आवश्यक होते. ती काळजी घेऊन आम्ही या बर्फाच्छादित भागामध्ये खूप मजा केली. येथे फोटो काढले, काही रिल्स सुद्धा बनवले. त्यानंतर दुपारनंतर ह्या पहाडावरून खाली उतरून जेवण करून पुन्हा आम्ही आमच्या श्रीनगर येथील निवासाकडे निघालो. श्रीनगर मध्ये संध्याकाळी चहा घेतल्यानंतर येथील मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जॅकेट्स, स्वेटर्स किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची शॉपिंग केली. येथे शॉपिंग करताना मात्र एक गोष्ट लक्षात आली की, येथे मोठ्या प्रमाणात बार्गेनिंग होते.
पर्यटनाचा चौथा दिवस म्हणजेच १४ एप्रिल. श्रीनगर येथील आमच्या हॉटेलमधून आम्ही सकाळी- सकाळी गुलमर्ग कडे प्रस्थान केले. गुलमर्ग हे श्रीनगर पासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. गुलमर्ग आणि सोनमर्ग या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ जरी असला तरी ही दोन्ही ठिकाणं खूप वेगळी आहेत. ज्या ठिकाणी आम्ही गाडी पार्किंग केली त्या ठिकाणापासून गुलमर्ग येथील बर्फ पाहण्यासाठी अर्थात बर्फात जाण्यासाठी घोड्यांशिवाय पर्याय नव्हता. आम्ही १९ जणांपैकी माझ्या बहिणीची तब्येत बरी नसल्याने ती आणि तिचे मिस्टर सोडून आम्ही सतरा जणांनी घोड्यावर रपेट करण्याचे ठरविले. या घोड्यावरून रपेट करतांना मात्र एक अत्यंत वाईट असा अनुभव आला. या घोड्यावरून रपेट मारतांना अचानक पणे एका घोड्या जवळ एक कुत्रा आडवा आल्याने तो घोडा बिथरला, उधळला. त्यामुळे त्या घोड्यावरून आमच्या कुटुंबातील एक सदस्य खाली कोसळले. मात्र सुदैवाने कुठल्याही प्रकारची मोठी दुखापत झाली नाही. गुलमर्ग येथे बर्फावर फोटोशूट करून दुपारनंतर आम्ही पुन्हा खाली आलो. येथील गोल्फ मैदान, पुरातन घरे आणि बर्फाच्छादित डोंगर आपले मन आकर्षित करून घेतात. संध्याकाळी हॉटेलवर आल्यानंतर सगळ्यांना एकत्रित करून अत्यंत वेगळ्या अशा कार्यक्रमाचे आयोजन साई टूर्स चे मालक सुनील तांडेल यांनी केले होते. याच दिवशी माझ्या बहिणीच्या लग्नाचा अकरावा वाढदिवस होता. आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता साई ट्रॅव्हल्स ने दोघांनाही मुंडावल्या बांधून भटजीच्या माध्यमातून मंगलाष्टके गाऊन अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
१५ एप्रिल रोजी काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणाला भेट देतांना एक वेगळाच आनंद झाला. श्रीनगर वरून पहलगाम हे ठिकाण सुमारे ९१ किलोमीटर अंतरावर असून येथे जात असतांना रस्त्याला वाकलेल्या सफरचंदाच्या बागा मनाला भुरळ पाडतात. या सफरचंदांच्या बागांमध्ये जाऊन रस पिणे म्हणजे एक वेगळीच मजा. ॲपल ज्यूस पिऊन आम्ही पुढील प्रवासाला लागलो. रस्त्याच्या बाजूला दुथडी भरून वाहणाऱ्या लिद्दर नदीच्या पात्रात फोटो काढून संध्याकाळी पहेलगाम येथे पोहोचलो. येथे एप्रिल महिन्यामध्ये पडत असलेला पाऊस आणि हुडहुडी थंडीमुळे बाहेर फिरतांना काश्मीरचे खरे रूप कळले. येथे संध्याकाळी दोन अंश सेल्सिअस इतके कमी तापमान होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तेथील गाड्या करून आम्ही अंमरनाथ यात्रा ज्या भागातून जाते ते ठिकाण म्हणजेच चंदनवाडी येथे गेलो. साधारणपणे दहाच्या सुमारास आम्ही चंदनवाडी येथे पोहोचलो. मात्र चंदनवाडी येथे अत्यंत कडाक्याची थंडी असल्याने तसेच अधून- मधून पावसाच्या सरी येत असल्याने वर बर्फाच्छादित भागामध्ये जाणे अत्यंत जिकरीचे होते. आमच्या आधी वर गेलेल्या पर्यटकांनी आम्हाला रस्ता खूप निसरडा आणि धोक्याचा असल्याचे सांगितल्याने आम्ही थोडे अंतर गेल्यावर पुन्हा माघारी वळलो. त्या नंतर आम्ही लीद्दर नदीच्या काठी असलेली बेताब व्हॅली ज्या ठिकाणी सनी देवोल यांच्या पहिल्या बेताब या प्रसिद्ध चित्रपटाचे शूटिंग झाले तेथे फोटोशूट केले. हे ठिकाण सुद्धा अत्यंत रमणीय असे ठिकाण आहे.
त्यानंतर पहेलगाम वरून कटरा कडे निघालो. पहलगाम ते कटरा हा रस्ता २१२ किलोमीटर अंतराचा होता. डोंगरदर्यातून जाणाऱ्या या रस्त्याला अकरा बोगदे असून नऊ किलोमीटर अंतराचा सर्वात मोठा बोगदा पार करतांना एक वेगळाच अनुभव आला. या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत. यावेळी या भागात जोरदार वारा आणि पाऊस होता. या भागात ट्राफिकची एक वेगळीच समस्या अनुभवायला मिळाली. सुमारे सहा ते सात किलोमीटर ट्राफिकच्या लागलेल्या लांबच्या लांब रांगेतून आमच्या रोमी नावाच्या ड्रायव्हरने वेगळीच शक्कल लढवून या ट्राफिक मधून गाडी काढून आम्हाला कटरा येथे संध्याकाळी सात वाजता अगदीच सुरक्षितपणे पोहोचवले. आमच्या सोबत असलेल्या दोन लक्झरी बस पैकी एक रात्री दहाच्या सुमारास कटरा येथे आली तर दुसरी लक्झरी बस पहाटे चारच्या सुमारास कटरा येथे पोहोचली. कटरा येथे रात्रीच्या वेळी पाऊस सुरू होता. सकाळी सुद्धा ढगाळ वातावरण असल्याने सकाळी आम्ही ज्या हेलिकॉप्टरने वैष्णव देवी येथे जाणार होतो ते हेलिकॉप्टर रद्द होण्याच्या मार्गात होते. मात्र वातावरण क्लिअर झाल्याने उशिराने हेलिकॉप्टरने उड्डाण केले. आमच्या सोबत असलेल्या बच्चे कंपनीने हेलिकॉप्टर मध्ये बसण्याचा एक वेगळाच आनंद अनुभवला. वैष्णव देवीचे मनोभावे दर्शन घेऊन दुपारी पुन्हा हॉटेलकडे आलो. संध्याकाळी येथून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिनाब नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग केले. त्यानंतर येथे पुरातन गृहेत असलेल्या नवदेवीचे दर्शन घेऊन शॉपिंग करून हॉटेल कडे परतलो.
१८ एप्रिल रोजी जम्मू- काश्मीरचा निरोप घेऊन आम्ही पंजाब राज्यामध्ये आलो. पंजाब येथील अमृतसर येथे असलेल्या अटारी सीमेवर संध्याकाळी साडेपाच ते सहाची जवानांचे रपेट पाहिली. भारत आणि पाकिस्तानच्या या सीमेवर भारतीय जवानांबरोबरच पाकिस्तानचे जवान यांची सुद्धा रपेट अनुभवायला मिळाली. वंदे मातरम, हिंदुस्तान जिंदाबाद, भारत माता की जय... अशा घोषणांनी सीमेवरील वातावरणात एक वेगळाच जोश निर्माण होऊन देशाभिमान जागृत झाला. येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये आपल्या जवानांविषयी अधिक अभिमान वाटू लागला. हे संचलन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय पर्यटक उपस्थित होते. या सीमेवरून थेट आम्ही सुवर्ण मंदिरात गेलो. सुवर्ण मंदिरात सुमारे दीड तासानंतर दर्शन घेऊन आम्ही आमच्या हॉटेलकडे परतलो.
१९ एप्रिल रोजी भारताच्या इतिहासामध्ये प्रसिध्द असलेल्या जालियनवाला बाग येथे भेट दिली. ज्या भारतीयांवर इंग्रजांनी अमानुषपणे हल्ला केला होता त्या ठिकाणाला भेट देतांना अंतकरण भरून आले होते. येथील विहीर तसेच शहीद झालेल्या भारतीयांची आजही अमर ज्योती सतत तेवत असते. त्या अमर ज्योतीला नमस्कार करून मृतात्म्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. अमृतसर वरून जालंदर येथे आलो. जालंदर येथून ३:३० ची स्वराज्य एक्सप्रेस पकडून २४ तासांचा दीर्घ प्रवास करून २० एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता पालघर येथे पोहोचलो.
काश्मीर मध्ये फिरतांना ठिकठिकाणी उभे असलेले जवान, उंचच उंच गेलेली सिल्वर ओक, अक्रोडची झाडे तर काही विशिष्टच वेळी सुरू असलेली ट्युलिप गार्डन मधील मनमोहक फुलांकडे पाहिल्यानंतर मनाला प्रचंड समाधान मिळते. आम्ही सोनमर्ग आणि गुलमर्ग येथे पडलेल्या बर्फाच्या चादरीवर केलेली पायपीट तसेच तेथील घोड्यांवर, गाड्यांवर फेरफटका मारत असतांना अधून मधून झाडांमधुन पडणारा बर्फ, बर्फाच्छादित शिखरे, डोंगरातून जाणारे नागमोडी रस्ते, हजारो फूट खोल दऱ्या, काश्मीरच सगळं रुपच काही औरच अनुभवायला मिळालं. पर्यटन हा काश्मीरच्या अर्थकारणाचा आधारस्तंभ आहे. एवढं मात्र नक्की काश्मीर आता खूप काही बदललंय. येथील पर्यटन दिवसेंदिवस अधिकाधिक बहरत आहे. आपण निवांतपणे आणि स्वच्छंदपणे काश्मीरमध्ये आता फिरू शकतो. जीवनात एकदा तरी काश्मीरला जावं असंच मी म्हणेन.
अशा पद्धतीने काश्मीरचा दौरा आमचा पूर्ण झाला. वस्तुतः निसर्गाने काश्मीरला इतक्या रंगानी सजावट केली आहे की त्यातील सौंदर्याचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. मी आमच्या दहा दिवसांच्या काश्मीरच्या दौऱ्याचे थोडक्यात वर्णन करण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. असं म्हणतात की, काश्मीरचे रूप हे तिन्ही ऋतूंमध्ये वेगवेगळे असते. त्यापैकी एका ऋतूमध्ये आम्ही अनुभवलं. नक्कीच उर्वरित दोन ऋतूंमध्येही ते अनुभवनं औसुक्याचे राहील.
- पालघर
आपली प्रतिक्रिया अवश्य येथे नोंदवा.
ReplyDeleteजणू काश्मीर दर्शन झाले
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteअतीशय सुंदर लेखन प्रवासवर्णन उत्कृष्ट भाषाशैली👌👍
ReplyDeleteधन्यवाद 🙏
DeleteTo visit any tourist spot is a normal thing and may be it's a routine for some people but after visiting a spot to compile experience in a very concised, chronological and interesting way is not only remarkable but speciality of specific people.You have been always shared your experience with us , earlier you have sharedyour experience about Education tour at Indonesia,Bali etc.It was a really a great work for readers as we have achieved the knowledge about their educational system and mode of teaching learning process at our home,but while reading it felt that we are there with you because you really composed your thoughts and experience in a very fascinating manner.
ReplyDeleteKeep it further to make aware us the world you visited.
Thanks sir🙏
Deleteह्याची देही ह्याची डोळा आपण नंदनवन असलेल्या काश्मीरच्या सौंदर्याचा आस्वाद घेतला त्या बद्दल
ReplyDeleteआपले मनस्वी अभिनंदन 🙏🙏💐💐
अगदी समर्पक शब्दांत शब्दांकन पाटील सर
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏
Deleteधन्यवाद सर
Delete