Skip to main content

बहुत जनांसी आधारू, निलेश सांबरे

बहुत जनांसी आधारू, निलेश सांबरे 

      "सेवा देण्याची वृत्ती अंगी असावी लागते. तुम्ही जेव्हा इतरांचा विकास करण्यासाठी मदत करतात तेव्हा त्यांच्या जोडीने तुमचाही विकास होतो " असे डेव्हिड ग्रीन यांनी म्हटलं आहे.

      सेवा हा संस्कृत शब्द आहे. सेवेला त्यागाची जोड दिल्यास आपली सेवा अधिक परिपूर्ण होऊ शकते. आपला समाज, शहर किंवा देश यांची सेवा करून आपण आपल्या निस्वार्थीपणाचा परीघ  आपल्या कुटुंबापलीकडे विस्तारू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे निलेश भगवान सांबरे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली या छोट्याशा गावापासून आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात करणारे निलेश सांबरे आज कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये अगदी निस्पृहपणे सेवा करत आहेत.

     ज्या समाजामध्ये आपण जन्मलो आहोत त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने प्रेरित होऊन कोकणचा कॅलिफोर्निया निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आज संपूर्ण कोकणात शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार, महिला सक्षमीकरण, क्रीडा व विविध सामाजिक क्षेत्रात निलेश सांबरे अगदी अविरतपणे काम करत आहेत.

    कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा  राहतो तो निसर्गाचं वरदान लाभलेला विस्तीर्ण भूप्रदेश. मात्र निसर्गाने सर्वकाही देऊन सुद्धा सर्वांगीण विकासापासून वंचित राहिलेल्या या कोकणाच्या सर्वांगीण विकासाचा आणि येथील सर्व लोकांच्या सक्षमीकरणाचा वसा घेऊन निलेश सांबरे हे अविरतपणे  कार्यरत आहेत. त्यांच्या स्वकमाईतून गेली १२ वर्षे त्यांची जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था अगदी प्रभावीपणे  कार्यरत आहे.

     समाजाच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती आणि महिला सक्षमीकरण या पंचसूत्रीनुसार जिजाऊची यशस्वी घोडदौड सुरू आहे. आर्थिक स्थितीमुळे कोकणातील एकही तरुण शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे विविध मोफत उपक्रम राबवले जातात. एकही रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्य सुविधांअभावी दगावला जाऊ नये, यासाठी मोफत सुसज्ज रुग्णालय, रुग्णवाहिका सेवा चालवण्याबरोबरच आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरं नियमित आयोजित केली जातात. कुपोषणापासून मुक्तीसाठी खास प्रयत्न सुरु असतात. प्रत्येक रिकाम्या हाताला काम मिळावे, यासाठी कौशल्य विकासाचा प्रयत्न असतो. त्यासाठी रोजगार साधने आणि खास प्रशिक्षणाचा प्रयत्नही असतो. निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोकणातील शेती ही तोट्यात जाऊ नये, ती जोडधंद्यांसह फायद्याची व्हावी यासाठी सतत काम सुरु असते. त्यासाठी फळरोपे, फुलझाडे वाटपाबरोबरच इतरही उपक्रम राबवले जातात. कोकणामध्ये शेतकरी विकास नद्यांना बंधारे बांधून बारमाही शेतीकरुन - तसेच दुग्ध व्यवसायास चालना देऊन सुजलाम सुफलाम बनवुन कुपोषणमुक्त कोकण घडविण्याचा त्यांचा  मानस आहे. कोकणातील महिला या  हिरकणीचा वारसा सांगणाऱ्या महिला असून अशा हिंमतवान मायभगिनींना सक्षम बनवलं तर कोकणाच्या सक्षमीकरणास मदत होईल. त्यामुळेच त्यांच्यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगारप्रवण करणारे विविध उपक्रम राबवले जातात.

 कोकणातून अधिकारी घडवण्याचे लक्ष्य!
   कुपोषण आणि आर्थिक मागासलेपणामुळे  कोकणातील तरुण प्रशासकीय सेवेत जात नाही किंबहुना प्रशासकीय सेवेतील त्यांचे प्रमाण खूपच हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहे. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी खास प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणात अधिकारी तयार करणे असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. कोकणातील तरुणांना विनामूल्य पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण सुद्धा दिले जात आहे.

 वैद्यकीय सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न...
    झडपोली येथे श्री.भगवान महादेव सांबरे सुसज्ज रुग्णालय सुरू करण्यात आले असून 
येथे २४ तास मोफत सुविधा उपलब्ध आहे. सुसज्ज १०० बेड्सचे रुग्णालय, महिला व बालकांसाठी विशेष कक्ष, कार्डिॲक रुग्णवाहिकेसहित, एक्स-रे, सोनोग्राफी, डायलीसिस, महिला प्रसुतीगृह इ. अत्याधुनिक वैद्यकिय सेवा उपलब्ध उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील जनतेला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. दिवसंदिवस महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याने पालघर व ठाणे येथील महिलांना कॅन्सर प्रतिबंधक लस देण्यात आली आणि दोन्ही जिल्ह्यांमधील महिलांच्या कॅन्सर तपासणीसाठी प्रतिवर्षी १०० शिबीरे घेण्यात येत आहेत. तसेच महिलांना व १५०० हुन अधिक कॅन्सरग्रस्त रुग्णांना टाटा हॉस्पीटलच्या व इतर विविध रुग्णालयांच्या माध्यमातुन यशस्वीरित्या उपचार करण्यात आलेले आहेत.
  
      विशेष म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने निलेश सांबरे यांच्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थे मार्फत संपूर्ण ठाणे, पालघर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सेवा उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच माध्यमातून रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, स्वच्छता अभियान, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धा, गायन स्पर्धा, कबड्डी स्पर्धा व हळदी कुंकू समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

    त्यांचे व्यक्तिगत जीवन हे सुख दुःखाचे जाळे म्हणता येईल. समाजाप्रती असलेल्या आस्थेमुळे त्यांचा स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अनेक जण स्वतःसाठीच जगतात, स्वतःच्या कुटुंबियांसाठी मेहनत व काबाडकष्ट करतात. काहीजण प्रचंड माया जमवून त्यातच आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानतात. पण स्वतः बरोबरच समाजासाठी, आपल्या परिसरासाठी किंबहुना राष्ट्रासाठी जगणारे काही मोजकेच अपवाद असतात. सामाजिक आणि व्यक्तिगत असे मानवी जीवनाचे दोन मार्ग असतात. सार्वजनिक जीवनात समता, मानवता आणि न्यायमूल्यांचा आविष्कार असतो तर दुसरा मानवी तत्त्व मूल्यांची जपणूक करतात. अशा सामाजिक, शैक्षणिक, सहकार व आर्थिक बाबींची जाण ठेवून कार्यरत असणारे निलेश सांबरे यांच्या कार्याला त्रिवार  सलाम!

 शेवटी समर्थांच्या शब्दात सांगायचे तर....
   " निश्चयाचा महामेरू ! बहुत जनांसी आधारु!
     अखंड कीर्ती निर्धारु! श्रीमंत योगी!!
       यशवंत किर्तीवंत! सामर्थ्यवंत वरदवंत!
        पुण्यवंत आणि जयवंत ! सच्चा कर्मयोगी!!"

- प्रमोद पाटील
    शिक्षण अभ्यासक
             तथा
     माजी अध्यक्ष/ माजी विश्वस्त
 सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका

Comments

  1. खुप छान लेख आहे सर मा.सांबरे साहेबांचे वास्तव कार्य डोळ्यांसमोर मांडणारा अप्रतिम लेख

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...