पालघर तालुक्यातील लोवरे येथील ९५ वर्षांचा प्रदीर्घ जीवन प्रवास करणाऱ्या आमच्या आजी म्हणजेच स्वर्गीय मुक्ताई जगन्नाथ पाटील यांचे शनिवार दि.१२ मार्च २०२२ रोजी वृद्धापकाळाने पालघर येथे देहावसान झाले.
आजीने लोवरे ग्रामपंचायतीच्या सक्रीय सदस्या म्हणून सुमारे १५ वर्षे अगदी निष्ठेने काम केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना, नातवंडांना उच्च शिक्षण दिले.त्यांच्या या खडतर परिस्थितीतील अतुलनीय शैक्षणिक योगदानाबद्दल सन २००६ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेतर्फे तत्कालीन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा. श्री. गजानन पाटील यांच्या हस्ते त्यांना " आदर्श माता पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले होते.
आमचं 'लोवरे' हे एक पालघर तालुक्यातील छोटेसे डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव. गावाच्या पूर्वेला घनदाट अरण्य तर पश्चिमेला खळखळ वाहणारी सूर्या नदी. या गावात विविध जातीचे लोक गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. आज गावात आणि पाड्या- पाड्यात चांगले रस्ते, दिवाबत्ती उपलब्ध आहे. प्राथमिक शिक्षणासाठी गावात शाळा आहेत. आज गावात सुशिक्षितांचा मोठा वर्ग आहे. अनेक जण सरकारी नोकरीतही सेवेत आहेत.
मात्र पन्नास वर्षांपूर्वीचा काळ लक्षात घेतला तर गावात कोणत्याही प्रकारची दळणवळणाची साधने नव्हती. शिक्षणाच्या सोयी सुविधा नव्हत्या. त्यामुळे कोणीही गावातील व्यक्ती सरकारी नोकरीत नव्हती. शेती हेच गावातील लोकांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होते. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत काटकसर करून प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन आजीने माझ्या वडिलांबरोबरच काका, आत्या आणि आम्हा नातवंडांना चांगलं शिकवलं. अत्यंत गरिबीत आपल्या पाच मुलांना आणि दोन मुलींना तसेच नातवंडांना शिक्षण देऊन समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला. त्यावेळी गावात शिक्षणाच्या सोयी- सुविधा आणि दळणवळणाचा अभाव असल्याने वसईतील माणिकपूर येथे खोली घेऊन सर्वांना शिक्षण दिले.
साऱ्या नात्यांना प्रेमाच्या रेशीमनात्याने बांधून ठेवणारी, साऱ्या घराला एक ठेवणारी, मायेची ऊब देणारी प्रेमळ व्यक्ती म्हणजेच आमची आजी. आजीच्या दृष्टीने आम्ही नातवंडं म्हणजे दुधावरची जणूकाही साय. आजीच्या हातची चव आम्हाला नक्कीच भुरळ घालत होती. आजीने बनवलेल्या कोणत्याही पदार्थात कधीही बाहेरचे मसाले न घालताही अनोखी चव येत असे त्याचे कारण कोणताही पदार्थ बनवतांना त्यात आजीने ओतलेली ममता, स्नेह आणि माया. आमच्या खोड्या सहजतेने पोटात घालणारी, प्रसंगी आमची बाजू घेऊन इतरांची समजूत घालणारी केवळ आजीच होती. आमचं मायेने संगोपन करणारी, आम्हाला प्रत्येक चांगल्या गोष्टीत प्रोत्साहन देणारी व्यक्ती म्हणजे आजी. मला इथे दोन गोष्टी प्रामुख्याने नमूद कराव्याशा वाटतात. त्या म्हणजे मला २०१६ मध्ये महाराष्ट्र शासनाचा "राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार" मिळाला. तसेच माझे शिक्षण व्यवस्थेवर आधारित "ज्ञानार्जनाची मुक्ताई" पुस्तक १३ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रकाशित झाले तेव्हा तिला खूपच आनंद झालेला मी पाहिला. पालघर येथील आमच्या घराला दिलेले तिच्या "मुक्ताई" या नावाचा तिला खूपच अभिमान वाटत असे.
माझी आजी केवळ आजी नव्हती, तर माझ्या दृष्टीने ती चालते-बोलते विद्यापीठ होती. माझ्या आजीचे नाव "मुक्ताबाई". पण गावातील ज्येष्ठ मंडळी किंवा आमचे जवळचे नातेवाईक तिला "मुक्ताय" किंवा "मुक्ताई" असेच संबोधत. सहनशीलता, सात्विकता, दयाळूपणा, ममत्व, कर्तव्य परायणता आणि अजूनही अनेक अशा सत्त्वगुणांचा खजिना म्हणजे माझी आजी होती. आमचे भाग्य खूप थोर म्हणून या खजिन्यातील गुणांचे माणिकमोती आम्हाला मिळाले. आमची आजी ही एक "संस्कारपीठ" होती. आजीनं आमच्यावर कधी मुद्दाम, सांगूनसवरून संस्कार केलेले आठवत नाही. तिच्या प्रत्यक्ष कृतीतून नकळतपणे ते मनावर उतरत राहिले. अजूनपर्यंत मी धूम्रपान किंवा मद्यपान न करण्याचे खरे संस्कार हे माझ्यावर आजीनेच केले. आजी "आनंदयात्री" होती. तिने आपल्या वागण्याने स्नेहाचे, आनंदाचे चांदणे सभोवार शिंपडले आणि आसमंत आनंदमय केले. द्वेष, मत्सर, उणेदुणे, राग याचा स्पर्शही कधी आजीने स्वत:ला होऊ दिला नाही. खूप मोठे कुटुंब तिने तिच्या प्रेमाच्या धाग्याने एकत्र बांधून ठेवले. कामाचा कितीही त्राण आला तरी आजीच्या चेहऱ्यावर पुसटशीही कंटाळलेली, त्रासिक रेषा कधी उमटलेली पाहिली नाही. उत्तम आरोग्याची गुरुकिल्लीच तिने आम्हाला दिली आहे.
पाऊसपाणी, कडाक्याची थंडी काहीही असो; पण न चुकता ती आम्हाला सकाळी- सकाळी नाश्ता तयार करून देत होती. काहीच न खाता घरातून बाहेर पडू देत नव्हती. प्रेमळ, मायाळू व आपुलकी जपणारी आजी गावातही सर्वांच्या आवडीची होती. गेल्या १५ वर्षापासून ती आमच्या सोबत पालघरला राहत होती. पण गावातील आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे आपुलकीने विचारपूस करायची. गावाशी नाळ तिची जुळलेली होती. घरी येणाऱ्याला चहा किंवा जेवणा शिवाय ती कधीच पाठवत नव्हती. आम्ही एखादं चांगले काम केलं तर ती तोंड भरून आमचं कौतुक करायची.आजीचे हे संस्कार घेऊनच आम्ही सारे यशस्वीपणे वाटचाल करीत आहोत. जे कौतुकाचे जिव्हाळ्याचे हात आमच्या डोक्यावरून फिरले तेच हात अंगणातील वेली, झाडावरून फिरायचे. घरात, घराच्या अवतीभवती स्वच्छता ठेवण्याकडे तिचा कटाक्ष असे.आजी आणि आम्हां नातवंडांचे नाते म्हणजे दुधावरच्या सायीसारखं होतं. गाभाऱ्यातल्या पिवळ्या प्रकाशात उजळलेलं तिचं रूप होतं.
संसाराचा गाडा हाकताना अगदी कठीण परिस्थितीतही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तिची धडपड यशस्वी झाली. माझे मोठे काका कृष्णा पाटील हे रेल्वे खात्यात अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. दुसरे कुसुमाकर काका हे महाराष्ट्र शासनाच्या दापचरी दुग्ध प्रकल्पात होते. हरेश्वर काका नरपड आणि नरोत्तम काका हे लालोंडे येथील माध्यमिक शाळांमधून मुख्याध्यापक म्हणून सेवा निवृत्त झाले आहेत. माझ्या वडिलांचे ऐन तरुण वयातच अकाली निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर मला आणि माझा छोटा भाऊ भगवान आम्हाला शिक्षण आणि संस्कार आजीनेच दिले. मी आज माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून तर माझा भाऊ भगवान हा टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. माझ्या काकू, चुलत भावंडे, बहिणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. विशेष म्हणजे आजही आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीचा आनंद उपभोगत आहोत. याचे संपूर्ण श्रेय हे आमच्या आजीलाच आहे.
"क्षीण क्षुद्र क्षणभंगुर दुर्बल मानव मिट्टी का प्याला।"
विख्यात हिंन्दी कवी हरीवंशराय बच्चन यांच्या या प्रसिद्ध काव्यपंक्तीची आठवण झाली. माणसाचे जीवन एखाद्या फुटक्या मडक्यासारख क्षणभंगुर आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. एक धागा सुखाचा असला की शंभर धागे दु:खाचे. मृत्यू हा कधी सांगुन सवरून येत नाही म्हणूनच "बोलावित विक्राळ यमाचे दूत" अशी अवस्था कधी कोणावर येईल याची शाश्वती नाही.अशीच काहीसी आजीची अवस्था झाली. कोणताही आजार नसतांना आमच्याशी बोलता- बोलता अचानक आमच्यातुन कायमची निघून गेली.
"कष्टातून संसार फुलविला
उरली नाही साथ आम्हाला,
आठवण येते क्षणा क्षणाला
आजही आम्ही वाट पाहतो
यावे पुन्हा जन्माला".
🙏🙏 ओम शांती शांती🙏🙏
- प्रमोद पाटील, पालघर
१८ मार्च २०२२
आजीस भावपूर्ण श्रद्धांजली, आजी बद्दलचे प्रेम आपल्या लेखणीतून उत्तम उतरलं आहे.
ReplyDeleteखूपच भावनिक आणि प्रेरणादायी सत्य तुम्ही मांडले .सर्वप्रथम त्याबद्दल खूप खूप आभार सर .खरच सर, तुम्ही खूप भाग्यवान आहात अश्या आजी तुम्हांला मिळाल्या .आपल्या जडणघडणीत आपल्या माणसांचेच मोठे योगदान असते. तुम्ही गेल्या वर्षी "ज्ञानार्जनाची मुक्ताई "पुस्तक सोहळा आयोजित फोटो बघितले तेंव्हा मनात आले की पुस्तकाचे नाव खूपच साजेसं आहे ,आणि आता कळले की तुमच्यावर संस्कार घडविणाऱ्या ,तुमच्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या ,वडिलांच्या अकाली निधनानंतर तुमच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या या माऊलीचे नाव आहे मुक्ताई .
Deleteमनःपूर्वक खूप खूप धन्यवाद आम्हांला या पोस्टमधून माहिती मिळाली त्याबद्दल 💐💐💐