Skip to main content

राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्त स्मरणार्थ शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्या भावना ! भाऊ, हे जाण्याचं वय नव्हतं... !

राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्त स्मरणार्थ शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्या भावना ! 



भाऊ, हे जाण्याचं वय नव्हतं... !

            राजीव सातव अर्थात माझे भाऊ! राजकारणातील माझे सच्चे मित्र, अनुभवी सहकारी, निर्व्याज मार्गदर्शक आणि मोठे बंधू !

भाऊ आपल्यात नाहीत हे स्वीकारायला मन आजही तयार नाही. मा. राहुलजींनी भाऊंना श्रद्धांजली अर्पण करताना एका प्रसंगाचा उल्लेख केला होता- युवक काँग्रेसच्या टॅलेन्ट हंट या कार्यक्रमासाठी  देशभरातून काही युवक काँग्रेसचे कार्यकर्ते बोलविण्यात आले होते. यामध्ये सगळ्यांत चांगला कार्यकर्ता कोण याविषयी राहूलजींनी विचारणा केली, त्यावेळी राजीवजींनी त्यांपैकी एका कार्यकर्त्याचे नाव सांगितले.  त्यानंतर दुसरा नंबर कोणाचा असे विचारल्यावर त्यांनी आणखी एका कार्यकर्त्याचे नाव सांगितले, परंतु त्यांनी स्वत:चे नाव सांगितले नाही. तसेच त्यांनी कोणत्याही सहकाऱ्याच्या अवगुणांचा उल्लेख केला नाही. ही बाब राहूलजींना खूप भावली, आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा भाऊंचा हा गुण राहूलजींनी हेरला.   

राजीवजींचं आणि माझं अत्यंत निर्भेळ असं नातं होतं.  आम्ही समवयीन. एखाददुसऱ्या वर्षाने पुढे-मागे. त्यांची आईकडून राजकारणाशी, काँग्रेसच्या विचारधारेशी नाळ जुळलेली तर माझी वडिलांकडून.  हा काँग्रेसच्या विचारांचा वारसा सांभाळताना सामान्य माणसांशी आणि मातीशी नातं दृढ करत सर्वसमावेशक राजकारण करणं आवश्यक असतं.  विश्वासार्ह माणूस आणि विश्वासार्ह लोकप्रतिनिधी बनणं महत्त्वाचं असतं.  या प्रवासात समंजसपणा, सुसंवाद आणि आश्वासकता यांचा मिलाफ साधता येणं तर अगदी काही जणांनाच जमतं.  राजीवजी हे अशा मोजक्या दुर्मीळ व्यक्तींपैकी एक होते. तरुण, अभ्यासू, संवेदनशील, अजातशत्रू, विचारी, प्रसन्न, चतुरस्र, वास्तवाचे भान असलेला, चौकटीच्या पलीकडे जाऊन कृती करणारा आणि दिल्लीत महाराष्ट्राची मोहोर उमटवणारा लोकप्रिय नेता, असाही त्यांचा अभिमानाने उल्लेख व्हायचा. राजकीय क्षेत्रात वावरताना माझ्यासाठी खंदे सहकारी, मार्गदर्शक व पाठीराखा भाऊ, अशीच त्यांची भूमिका  होती.  

राजीव सातव या नावाला राजकीय वारसा लाभला होता.  पण त्याचा आधार न घेता आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भाऊंनी राजकारणात पाऊल ठेवले ते पंचायत समितीच्या निवडणुकीपासून.  मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी या आपल्या तालुक्यापासून त्यांनी सुरुवात केली. पंचायत समिती सदस्य, मग जिल्हा परिषद व विधान सभेत यश मिळवून पुढे खासदारकीपर्यंत भाऊंनी स्वकर्तृत्वावर उत्तुंग झेप घेतली. हिंगोली सारख्या अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या जिल्ह्याच्या आशाआकांक्षा समजून घेऊन त्यांना मूर्त स्वरूप देऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. अशक्य ते शक्य करून दाखवणं हे भाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य होतं.

निवडणूक लढवण्याची आणि जिंकण्याची ताकद राजीवजींमध्ये होती, हे निर्विवाद पण त्याही पलीकडे जाऊन आजच्या काळात  पक्षाचा विचार जिवंत ठेवणं ही मोठी कामगिरी भाऊंनी केली.  राष्ट्रीय राजकारणात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली ती याचमुळे.  युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून, नंतर गुजरातचे प्रभारी म्हणून त्यांनी निभावलेली जबाबदारी लक्षणीय ठरली.  प्रत्येक टप्प्यावर अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधत, यशापयशातून शिकत त्यांचं अभ्यासू नेतृत्व सदैव बहरतच गेलं.  

निरीक्षण, अभ्यास आणि मांडणी  या तीनही पैलूंवर भाऊंची विलक्षण पकड होती. राजकारणातले तिढे सोडवत असताना लोकांच्या प्रश्नांना महत्त्व देणं किती आवश्यक आहे, हे भाऊ जाणून होते. अगदी मूलभूत अशा शेती, रोजगार, दुष्काळ या विषयांबाबत ते सदैव जागरूक असत.  समाजकारण हा राजकारणाचा पाया असतो याचं त्यांना भान होतं, त्यांनी स्वत: कायद्याचा अभ्यास  केला होता. पण राजकारणासारख्या व्यस्त क्षेत्रात असूनही  शिक्षणाची नाळ तुटू दिली नाही. अगदी अलीकडच्या काळात केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांना अभ्यासपूर्ण विरोध करताना त्यांनी केलेली मुद्देसूद आणि कायदेशीर मांडणी लक्षवेधी ठरली.

राष्ट्रकूल संसदीय मंडळाचा ‘उत्कृष्ट भाषण पुरस्कार’ स्वीकारताना मला प्रकर्षाने भाऊंची आठवण झाली. लोकांचे प्रश्न संसद अधिवेशनात मांडण्यात भाऊ नेहमीच अग्रेसर होते. मतदारसंघातील अनेक प्रश्न संसदेत मांडून ते धसास लावण्याचा प्रयत्न केला. त्यांची संसदेतील उपस्थिती उल्लेखनीय होती.  या कामगिरीचा विचार करून भाऊंना चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

2014 ची लोकसभा निवडणूक आणि 2017 ची गुजरात विधानसभा निवडणूक ही राजीवजींच्या उल्लेखाविना अधुरी ठरेल. यामध्ये भाऊंच्या मुत्सद्देगिरीचं, राजकीय परिपक्वतेचं, संयम आणि हिमतीचं अनोंख रूप पाहायला मिळालं.  लोकसभा असो, की राज्यसभा आपल्या मतदारसंघातल्या जनतेशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. उलट काळाच्या ओघात ते ऋणानुबंध अधिक दृढ होत गेले. पालकमंत्री या नात्याने मी जेव्हा जेव्हा हिंगोलीमध्ये वावरले तेव्हा तेव्हा मला त्याची प्रचिती यायची. दिल्लीत राजीव सातव नावचं एक वलय होतं. 2014 ला एका वेगळ्या अर्थाने राजीवभाऊंच्या राजकीय कौशल्याचा आणि नैपुण्याचा कस लागला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते  लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाले.

वयाच्या अवघ्या 45-46 व्या वर्षी  काँग्रेससारख्या भारताच्या जडणघडणीत अतुलनीय योगदान देणाऱ्या राष्ट्रीय पक्षात स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं. पण ते काही त्यांचं ध्येय नव्हतं. खरंतर माजी मंत्री असणाऱ्या आईच्या राजकीय वारशाचा लाभ घेत  मतदारसंघातलं, पक्षामधलं  स्वत:चं स्थान बळकट करण्याचा सहजसोपा पर्यायही उपलब्ध होता. काँग्रेस  पक्षाच्या तत्त्वांवर, घटनात्मक मूल्यांवर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती. काँग्रेसची यंग ब्रिगेड शोधणं, घडवणं आणि नवीन पिढीस सक्रिय राजकारणात आणण्यासाठी ते झटत होते. सुसंवादाने जुन्या-नव्यांची समन्वय साधून पक्ष संघटन  मजबूत करण्याचा ते सतत प्रयत्न करत होते.

व्यक्तिगत पातळीवर सर्वपक्षीय नेत्यांशी ऋणानुबंध राखणाऱ्या राजीवजींनी काँग्रेसची विचारधारा अखंड वाहती राहावी, म्हणून प्रत्येक स्तरावर अविरत प्रयत्न केले हे वेगळे सांगण्याची गरज नाही. काँग्रेस हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर तो अवघ्या भारताला, भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला कवेत घेऊ पाहाणारा, स्वातंत्र्य- समता- सर्वधर्मसमभाव- बंधुता या मूल्यांशी नाळ जोडणारा, माणुसकीशी नातं सांगणारा विचार आहे. आजच्या नव्या भारतातल्या तरुणाईच्या मनात हा विचार नव्या जोमाने पेरत जाण्याची गरज आहे. त्यासाठी नवे पर्याय आणि कल्पक मार्ग शोधण्याची जिगर राजीवभाऊंमध्ये होती. माझं ते खरं, माझं तेच बरोबर आणि म्हणून इतरांनी ते ऐकलंच पाहिजे असा हट्टाग्रह त्यांच्या विचारात, मांडणीत, वर्तनात कधीच नसायचा. लोकशाहीवर त्यांची निष्ठा होती. संघटनशक्तीचं मूल्य ते जाणत होते. संवाद व  चर्चा करून विधायक पद्धतीने  प्रश्न सोडवता येऊ शकतात यावर त्यांचा विश्वास होता. अलीकडच्या काळातल्या ध्रुवीकरणाकडे झुकू लागलेल्या वातावरणात सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा विचार महत्त्वाचा होता.  

मी तर माझा भाऊ गमावला आहे. कळमनुरी – माझे माहेर आज सुनेसुने झाले आहे. आई, प्रज्ञा वाहिनी, पुष्कराज व तितली यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आज गरज आहे. त्यांना कधीही एकटेपणाची जाणीव होणार नाही याची आपण काळजी घेऊ.  

हिंगोली जिल्ह्यातील सर्व जनतेला आणि कार्यकर्त्यांना मी आवाहन करते, की आज भाऊ जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा विचार आपल्यासोबत आहे, त्यांनी उभे केलेले पक्षसंघटन आणि आपल्या सारख्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी सोबत आहे. मी आणि पक्षसंघटना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोतच या सर्वांच्या मदतीने आपण पुन्हा जोमाने सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध होऊया.

Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...