Skip to main content

आपली संस्कृती!

प्रमोद पाटील (पालघर)

श्रावण मासी हर्ष मानसी

हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात फिरुनी उन पडे.

   बालकवींनी श्रावण महिन्याचे अत्यंत सुंदर वर्णन  आपल्या कवितेमध्ये केले आहे.

    भारतीय संस्कृती मध्ये सण, उत्सव, वैकल्ये  यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव येत असतात. या महिन्यात  संपूर्ण वातावरण अगदी प्रसन्न, हिरवेगार व उत्साहदायी असते.उन्हातील पाऊस आणि पाऊसातील ऊन पाहिले की मन भरून जाते. श्रावण महिन्यामध्ये निसर्ग हिरवागार होऊन जातो. कधी अचानक पाऊस पडतो तर कधी अचानक ऊन पडते.श्रावण महिन्यात रिमझिम पडणाऱ्या पाऊसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो. आकाशातून बरसणाऱ्या सरींमध्ये भिजून जावे असे अनेकांना वाटते. श्रावणातील अशा अल्हाददायक वातावरणामुळे झाडे, फुले, पिके अगदीच ताजेतवाने दिसतात. आकाशामध्ये अधून मधून रंगबेरंगी इंद्रधनुष्य पाहून तर मन अगदी प्रसन्न होऊन जाते.श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव येत असतात. भाविक मोठ्या उत्साहात हे सर्व सण साजरे करत असतात.

         या श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी येणार्‍या आषाढी अमावास्येला दीप अमावस्या म्हणून संबोधले जाते. या दिवशी घरातील दिवे घासून पुसून स्वच्छ आणि लख्ख केले जातात. त्यांची पूजा केली जाते. यापुढे श्रावणातील व्रत वैकल्यांना सुरुवात होते म्हणून दिवे स्वच्छ करण्याची प्राचीन काळापासून परंपरा असावी. महाराष्ट्रात या दीप अमावस्येलाच गटारी अमावस्या म्हटले जाते. गटारी अमावस्या हा शब्दप्रयोग का केला जात असावा याबद्दल जास्त ऊहापोह न केलेला बरा. वास्तविक पूर्वी या अमावस्येच्या  दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार वर्ज केला जात असे. कारण या पुढे श्रावण महिन्यात सण-वार, व्रत-उत्सव साजरे केले जातात. म्हणूनच या दीप अमावास्येच्या दिवशी  मांसाहारी पदार्थांचा समावेश असतो. अनेक हिंदू श्रावण महिन्यात मास-मदिराचे सेवन करणे टाळतात. म्हणूनच श्रावण महिना सुरु होण्याच्या एका दिवसापूर्वी हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. 

    श्रावण महिन्यातील वातावरणात मांसाहार पचायला कठीण असतो. हा काळ बहुतेक प्राण्यांचा प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली तर साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो. बाहेरच्या वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरात आणि शरीरावर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. असे अन्न शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे एकदा याला धार्मिक जोड दिली की आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो. अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या रानावनात याच काळात उगवतात. शाकाहारामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.  पुढे साजऱ्या होणाऱ्या अनेक सणांसाठी, पूजांसाठी तयारी म्हणून पूर्वींच्या मोठमोठ्या घरातून विविध दिवे शोधून ते साफसूफ करून या दिवशी अत्यंत भक्तिभावाने पूजले जात असत. आजही या दिवशी महाराष्ट्रातील लाखो मराठी घरात असेच मनोभावे दिपपूजन करून, अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण नैवेद्य दाखवतात. खूप आनंददायी आणि मंगल अशी ही दीप- अमावस्या साजरी केली जाते. 

      महाराष्ट्रीयन लोकांसाठी श्रावण महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. बरेच लोक महिनाभर उपवास करतात, ज्यात ते एकभुक्त अर्थात एकदाच आहार ग्रहण करणे, काहीजण फळांचा आहार घेणे अथवा वेगवेगळ्या पद्धतीने आहार घेऊन या महिन्यात व्रत नियम, आचार- विचारांचे पालन केले जाते. थोडक्यात, श्रावण महिन्याला भारतीय संस्कृती मध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.


- प्रमोद पाटील,

     पालघर 

 

Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...