Skip to main content

गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समूहाचा असाही आदर्श

गुरुकुल खरात कुटुंबिय सहाय्य निधीचे जालना येथे वितरण
--------------------------
 पालघर (प्रमोद पाटील ) ता.11 ऑक्टोबर 2016 
आत्ताच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगात समाजात माणुसकी हरवत चालली आहे अशी ओरड आपण नेहमीच ऐकत असतो. तसेच सोशल नेटवर्किंग मुळे नवीन पिढी बरबाद होत आहे अशी ही ओरड एका बाजूने सुरू असताना एका निराधार कुटुंबाला केवळ "गुरुकुल व्हाॅटसअप ग्रूप" च्या माध्यमातून सुमारे 55,555/_ रूपयांची रोख रक्कम देऊन समाजात माणूसकी अजूनही शिल्लक आहे हे दाखवून दिले आहे. 
        मराठवाडयातील जालना जिल्ह्य़ातील जाफराबाद येथील समर्थ विद्यालयात विना अनुदानित शाळेत कार्यरत असलेल्या गजानन विठोबा खरात या शिक्षकाचा विना अनुदानित शाळांना अनुदान मिळावे या करिता औरंगाबाद येथे आंदोलन करित असतांना शुक्रवार दि.10 जुन 2016 रोजी अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. खरात यांच्या पश्चात त्यांची आई चंद्रकला विठोबा खरात (वय 56), पत्नी सुकेशनी (वय 24) व मुलगा यश(वय 3) असा परिवार असून गजानन खरात यांच्या पश्चात कमावणारी व्यक्ती कुटुंबात नसल्याने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले. ही घटना संपूर्ण राज्यभर वाऱ्यासारखी पसरली होती. 
   तसेच गजानन खरात यांची शेत जमीन नसल्याने आणि ते विना अनुदानित शाळेत नाममात्र मानधनावर काम करत असल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. म्हणून ते शाळेच्या वेळे व्यतिरिक्त मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. तसेच गावापासून शाळेपर्यंत सुमारे सहा किलोमीटर अंतर ते दररोज पायी ये- जा करत असत.  मात्र त्यांच्या मृत्यूनंतर  कुटुंबाचा आधारच निखळला. संपूर्ण कुटुंबच निराधार झाले आहे. 
      सदर वृत्त "गुरुकुल" व्हाॅटसअप ग्रूप वर सविस्तर टाकण्यात आले. तदनंतर "गुरुकुल सहाय्य निधी समिती" स्थापन करून या समितीच्या माध्यमातून "गुरुकुल खरात कुटुंबिय सहाय्य निधी" जमा करण्यात आला.  या ग्रूपच्या माध्यमातून स्व इच्छेने शिक्षकांनी पाचशे रुपयांपासून दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा करण्यात आली. 
      ही जमा झालेली रूपये, 55,555/_ रक्कम मयत शिक्षक गजानन खरात  यांच्या जालना जिल्ह्य़ातील जाफराबाद (वरखेडा)या त्यांच्या मुळगावी जाऊन त्यांच्या पत्नी व आई यांच्या हाती गुरूवारी (ता.10) गुरुकुल सहाय्य निधी समितीचे डॅरेल डिमेलो, प्रमोद पाटील, विलास पाटील,संजय पाटील, राम पाटील, सुधाकर ठाकूर आदी शिष्टमंडळांनी सुपूर्द केली. या वेळी गावचे पोलीस पाटील विठ्ठल डवणे, सामाजिक कार्यकर्ते गजानन उबाळे, मधुकर खरात, प्रकाश राऊत आदी उपस्थित होते.या बहुमुल्य मदतीबद्दल खरात यांच्या पत्नी व आई  यांनी सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले .
     यापुढेही जर एखाद्या शिक्षकाच्या बाबतीत अशी दुर्दैवी घटना घडली आणि कुटूंबापुढे आर्थिक संकट उभे राहिले तर मदतीचा हात देण्याचा मनोदय शिक्षकांनी व्यक्त केला आहे. शिक्षकांची संवेदनशिलता वरील उदाहरणातून दिसुन येते. प्राचीन काळापासुन शिक्षकांची समाजाप्रती असलेली माणूसकिची भूमिका आजही दिसून येते.अध्यापना बरोबरच शिक्षक समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी व समाज हितासाठी मेहनत घेतात.
            #असाही प्रसंग-
गुरुकुल सहाय्य निधीचे वितरण खरात यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी व आई यांच्या कडे करण्याचे ठरले. बुधवारी(ता.9 ऑक्टोबर 2016)सकाळी पालघर वरून आम्ही जालना कडे निघालो.  गुरुवारी(ता.10) दुपारी बाराच्या सुमारास जाफराबाद येथे पोहोचलो. सदर गाव जाफराबाद पासून सहा किलोमीटर अंतरावर असून या गावात कार जात नाही. या कामी येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन उबाळे यांनी गावातून तीन मोटारसायकल मागवून आम्हाला खरात यांच्या घरी नेले. मात्र मयत शिक्षक गजानन खरात यांच्या तीन वर्षांच्या मुलाला निमोनिया झाल्याने त्यांच्या पत्नी बाळाला घेऊन सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखली(विदर्भ) येथील दवाखान्यात  होत्या. घरी गजानन खरात यांच्या आई व गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती होत्या. त्यांच्या बरोबर हितगुज केली असता खरात कुटुंबाला राहायला झोपडी साठी एका व्यक्तीने जागा दिली आहे. या झोपडीची खुपच दयनीय अवस्था आहे. 
      तदनंतर आम्ही तेथून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखली येथील दवाखान्यात जाऊन खरात यांच्या पत्नी व आजारी असलेला त्यांचा मुलगा यश ला जाऊन भेटून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.  
         - #खरात कुटुंबाची मागणी-
घरातील कमावणारी व्यक्ती गेल्याने मयत शिक्षक गजानन खरात यांच्या पत्नी सुकेशनी खरात यांना सरकारी नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी खरात कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.
    या वेळी पालघर येथून गेलेल्या गुरुकुलच्या शिक्षक कार्यकर्त्यांना भावना आवरणे कठीण झाले होते.

Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...