हरेश्वर पाटील, प्रामाणिक आणि संयमी व्यक्तिमत्व
३८ वर्षे सेवेत प्रदीर्घकाळ प्रामाणिकपणे काम केल्यानंतर ग्रामीण विभाग श्रमिक शिक्षण संस्था लालोंडे संचलित स्वर्गीय विद्या विनोद अधिकारी विद्यालय लालोंडे येथील शिक्षकेतर कर्मचारी श्री. हरेश्वर शिवराम पाटील हे आज ३० जून रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
शासकीय किंवा निमशासकीय सेवेतून निवृत्त होताना चेहऱ्यावर निश्चित समाधान असते. आपल्या आयुष्याची हीच खरी शिदोरी असते. सेवा निवृत्तीचा दिवस हा प्रत्येकासाठी एक अनमोल दिवस असतो.
पालघर तालुक्यातील सागावे येथील श्री. हरेश्वर शिवराम पाटील यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून आपले शिक्षण घेऊन चरितार्थासाठी आपल्याच भागातील लालोंडे येथील विद्यालयात १९८३ मध्ये नोकरी स्वीकारली. त्या काळामध्ये शासकीय-निमशासकीय नोकरी मिळणं तसे फार कठीणच होते. मात्र त्यांच्या अंगी असलेला प्रामाणिकपणा आणि आणि काम करण्याची जिद्द यामुळे त्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली. आपली नोकरी करत असतानाच समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाण ठेवून त्यांनी सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाच्या कार्यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी युवक मंडळाचे चिटणीस म्हणून यशस्वीरीतीने धुरा सांभाळली.
त्यांचे कामासाठी असलेले समर्पण खरोखरच प्रशंसनीय होते. मी आशा करतो की निवृत्ती काळात त्यांच्या आयुष्यात आनंद आणि मिठीत सुख समृद्धी कायम राहील हीच अपेक्षा.
शेवटी एवढंच...
नवे क्षितीज, नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची पहाट,
हे स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर सदैव राहो,
तुमच्या पाठिशी हजारो सूर्य तळपत राहो,
आपणास सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा!
Comments
Post a Comment