Skip to main content

पालघर येथील गुरुकुल समूह तरुणांना आदर्शवत....

पालघर येथील गुरुकुल समूह तरुणांना आदर्शवत  
 
      आजच्या या डिजिटल युगामध्ये सोशल मीडिया संपूर्ण जगातील सर्वात मोठे संप्रेषणाचे माध्यम बनले आहे. किंबहुना सोशल मिडीया मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. या सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून पालघर येथील गुरुकुल समूहाने तरुणांपुढे  एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
       1 ऑगस्ट 2014 रोजी राज्यातील छत्तिसावा जिल्हा म्हणून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. विशेषतः या जिल्ह्याची रचना नागरी, सागरी आणि डोंगरी अशी असल्याने इतर जिल्ह्यांपेक्षा हा एक वेगळा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांनी एकत्र येऊन गुरुकुल व्हाट्सअप ग्रुप सुरू केले आहेत. आज  गुरुकुल चे तीन व्हाट्सअप व एक फेसबुक ग्रुप असून सोशल मीडियामध्ये गुरुकुल ग्रुपने एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे.
          गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक एकमेकांशी मोठ्या प्रमाणात संवाद साधत आहेत. सोशल मीडियाशिवाय आपल्या जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. त्यामुळे शहरांबरोबरच गावोगावी इंटरनेटची जोडणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्यूब अशी काही सोशल मीडियाची लोकप्रिय माध्यमं आहेत. 
          कोरोनाच्या आपत्तीमुळे गेल्या एक-दीड वर्षापासून राज्यातील शाळा- महाविद्यालये बंद आहेत. मुलांचे शिक्षण मोबाईल अथवा लॅपटॉप वर सुरू आहे. या अनुषंगाने गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समूह आणि माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने 1 एप्रिल ते 15 एप्रिल 2021 या दरम्यान सतत पंधरा दिवस गुरुकुल व्याख्यानमाला इयत्ता दहावी आणि बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. पालघर जिल्ह्यातील 20 तज्ञ विषय शिक्षक आणि राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील 10 तज्ञ विषय शिक्षक अशा एकूण 30 तज्ञ मार्गदर्शकांनी या व्याख्यान माले मध्ये दररोज दोन ते अडीच तास त्या त्या विषयाचे मार्गदर्शन विद्यार्थी आणि  शिक्षकांना केले. ग्रामीण आणि दुर्गम भागात नेटवर्कची समस्या लक्षात घेऊन झूम बरोबरच युट्युब वर ही व्याख्यानमाला घेण्यात आली. ज्या विद्यार्थी वा शिक्षकांना नेटवर्क चा प्रॉब्लेम असेल तर असे विद्यार्थी किंवा शिक्षक त्यांच्या सोयीनुसार ही व्याख्यानमाला युट्युब वर बघू शकत आहेत. आत्तापर्यंत तीस हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेतला. या व्याख्यानमालेचे विशेष म्हणजे व्याख्यानमालेच्या सुरुवातीला दररोज शिक्षण क्षेत्रातील अधिकारी वर्गाने विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. ही व्याख्यानमाला राज्यातील आदर्शवत व्याख्यानमाला म्हणून संबोधली जाते. ई-बुकच्या माध्यमातून एकाच क्लिकवर ही व्याख्यानमाला विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत पोचवण्याचं काम गुरुकुल समूहाने केलं आहे.
          साधारणपणे मार्च- एप्रिल महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये कोरोना च्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने अंशतः सुरू असलेल्या दहावी-बारावीचे वर्ग सुद्धा बंद करण्यात आले. या काळामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या मनामध्ये कोरोना विषयी भीती दूर करण्याच्या दृष्टीने गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समूह आणि युवाशक्ती प्रतिष्ठान पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथील कोरोनाच्या टास्क फोर्स सदस्य तथा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. प्रिया प्रभू यांचे कोरोना जनजागृती विषयी वेबिनार 11 मे रोजी आयोजित करण्यात आले. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत मुलांना धोका वर्तविला जात असल्याने पालघर जिल्ह्यातील डॉक्टर हेमंत जोशी, डॉक्टर सूर्यकांत संखे, डॉक्टर अर्चना जोशी, डॉक्टर अंजली गोकर्ण आणि डॉक्टर जयश्री देशपांडे या पाच बालरोग तज्ञ डॉक्टरांनी कोरोनाच्या तिसऱ्याला लाटे पासून मुलांना कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी  याबाबत  29 मे रोजी सखोल मार्गदर्शन केले. तसेच अलीकडे तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत असल्याने तरुणांना या व्यसनापासून दूर राहण्यासाठी तंबाखू मुक्ती वर व्याख्यानमालेचे
2 जून आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमाले मध्ये वसई येथील मनोविकार तज्ञ डॉ. सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.
        कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये काही शिक्षक त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच मित्र वर्ग बळी पडले. त्यांच्या विषयी संवेदना व्यक्त करण्यासाठी गुरुकुल समूहाने 14 ते 31 मे यादरम्यान दुखवटा व्यक्त केला. या काळामध्ये समूहामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा न देता सर्वांनी कोरोनामुळे मृत पावलेल्यांबद्दल भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली.
       गुरुकुल शिक्षक समूहाच्या माध्यमातून 2016 मध्ये विनाअनुदान तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या औरंगाबाद येथे झालेल्या आंदोलनात जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील समर्थ विद्यालयाचे शिक्षक स्वर्गीय गजानन खरात मृत्यू पावले. सदर बाब सोशल मीडियावर व्हायरल होताच गुरुकुल समूहाच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांना रु.55,555/- ( 55 हजार 555 रुपये) आर्थिक मदत त्यांच्या घरी जाऊन देण्यात आली. ऑगस्ट  2019 मध्ये कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात पुराने थैमान घातले. या पुरामुळे येथील शाळांचे सुद्धा खूप मोठे नुकसान झाले. गुरुकुल समूहाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील पूरग्रस्त जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला रु. 1 लाख 6 हजार 222/- आर्थिक सहाय्य, शैक्षणिक मदत करण्यात आली.
        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 28 मे च्या शासन निर्णयानुसार राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाल्याने नव्याने मूल्यमापन करण्याचे परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या कामकाजामध्ये एकसूत्रपणा यावा यासाठी गुरुकुल समूहा बरोबरच पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून 13 जूनला इयत्ता दहावी मूल्यमापन कार्यपद्धती व शंका समाधान या विषयावर तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात आले. 
       शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी समूहाच्या माध्यमातून शिक्षकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. कोरोना च्या काळामध्ये  निबंध स्पर्धा, काव्य गायन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समूहा मधील कला शिक्षकांनी कोरोना लॉकडाऊन मध्ये विविध पोस्टर्स, व्यंगचित्रे, लेखांद्वारे जनजागृती करण्याचे मोलाची कामगिरी केली आहे.
          आज शिक्षणामध्ये सोशल मीडिया महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेतच. लोक सोशल मीडियावर बराच वेळ घालवतात, ज्यामुळे ते कोठेतरी त्यांच्या प्रियजनांपासून दूर जातात हेही सत्य आहे. सोशल मीडियाच्या आकर्षणाच्या पार्श्वभूमीवर तरुण आणि मुले त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास असमर्थ बनतात अशीही ओरड पालकांकडून केली जात आहे. मात्र गुरुकुल समूहाने सोशल मीडियाचा उपयोग लोकांमध्ये सामाजिक विकासाबद्दल आणि बर्‍याच विषयांबद्दल जनजागृती करण्यासाठी केला तर निश्चितच चांगलेच आहे याचा प्रत्यय आणून दिला आहे. सोशल मीडियामुळे मुले खेळात कमी रस घेत आहेत, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. बरेच लोक सोशल मीडियाचा गैरवापर करतात. आपण अशा गोष्टींबाबत सावध राहणे गरजेचेच आहे. जर सोशल मीडियाचा योग्य हेतूने वापर केला गेला तर ते नक्कीच वरदानापेक्षा काही कमी नाही. आपल्या देशातील तरुण सर्वाधिक सोशल मीडियावर सक्रिय राहतात. याचा त्यांच्या भविष्यावर परिणाम होत आहे.  सोशल मीडियाद्वारे हॅकिंग, पासवर्ड चोरी करणे यासारख्या चुकीच्या गोष्टीं सुद्धा होत आहेत, हे सुद्धा नाकारता येत नाही. मात्र गुरुकुल च्या माध्यमातून सुरू असलेले सर्व उपक्रम निश्चितच सर्वांना प्रेरणादायी आहेत.
      गुरुकुल ग्रुपमध्ये उपक्रमशील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी वर्ग,शिक्षक लोकप्रतिनिधी ( आमदार) आदींचा समावेश आहे. या ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी पालघर जिल्हा बरोबरच राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शिक्षकांची सातत्याने मागणी असते
- प्रमोद भालचंद्र पाटील
      गुरुकुल ग्रुप ॲडमिन
          
   

Comments

  1. In this covid situation you all are doing such a great job....simply great

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...