रणजितसिंह डिसले यांनी
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण अक्षरांनी कोरले महाराष्ट्राचं नाव
... प्रमोद पाटील
गुरुवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखे पसरत असलेली पोस्ट निश्चितच शिक्षण क्षेत्रात कार्य करत असलेल्या प्रत्येक घटकाला आनंदाची, अभिमानाची आणि अविस्मरणीय घटना म्हणता येईल. शिक्षण क्षेत्रातील या घटनेची इतिहासात आवर्जून नोंद होईल.
युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा "ग्लोबल टीचर अवॉर्ड" या पुरस्कारासाठी या वर्षी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांची निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
जगभरातील 140 देशांमधील बारा हजाराहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून डिसले सरांची निवड झाली आहे. या पुरस्काराचे स्वरूप 7 कोटी रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे. या पुरस्काराला शिक्षण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कसे सुद्धा संबोधले जाते.
शिक्षण क्षेत्रात QR कोडमुळे महाराष्ट्राचे नाव देशात अभिमानाने घेतले जाते. त्या क्यूआर कोड चे जनक आदरणीय डिसले सर असून त्यांच्या या कामगिरीची नोंद आंतरराष्ट्रीय घेण्यात आली आहे. या पुरस्काराने आपल्या देशातील शिक्षकांची प्रज्ञा,प्रतिभा आणि प्रतिष्ठा यांची उंची जागतिक पातळीवर दखलपात्र ठरली आहे. या पुरस्कारामुळे शिक्षकांना फार मोठी ऊर्जा प्राप्त होणार आहे. त्यांच्या या अत्युच्च कामगिरीसाठी दैदिप्यमान, नेत्रदीपक, अद्वितीय, अवर्णीय असे शब्द सुद्धा कमी पडणार आहेत.
डिसले सरांच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीमुळे निश्चितच शिक्षण क्षेत्रात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
- प्रमोद भालचंद्र पाटील, पालघर
छान सर
ReplyDeleteछान सर
ReplyDelete