Skip to main content

दिव्यांगांचा आधारवड हरपला...

दिव्यांगांचा आधारवड हरपला...

        पालघर टाइम्सचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, वंदे मातरम अंध-अपंग सेवाभावी संस्थेचे सल्लागार, आदिवासी मित्र पुरस्काराने सन्मानित, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.अशोक नाना चुरी यांचे वयाच्या 71 व्या वर्षी शुक्रवारी 7 ऑगस्ट रोजी सकाळी अकस्मात दुःखद निधन झाल्याची वार्ता समजली. ही दुःखद वार्ता एकताच धक्काच बसला.
         पालघर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या वंदे मातरम अंध-अपंग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या सात-आठ वर्षांपासून चुरी काकांच्या सोबत काम करण्याचा योग आला. ते या संस्थेचे सल्लागार होते. अत्यंत संयमी आणि शांत स्वभावाचे चुरी काका संस्थेच्या कोणत्याही उपक्रमात स्वतःला झोकून देत होते. सामुदायिक विवाहाची संकल्पना समाजात रुजवण्यासाठी त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात पालघरमध्ये केली. दिव्यांग व्यक्ती शक्यतो विवाहास तयार होत नाहीत. या दिव्यांगांना विवाह करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सामुदायिक विवाह संकल्पनेतूनच दिव्यांगांच्या सामुदायिक विवाहाची संकल्पना पुढे आली. वंदे मातरम संस्थेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून चुरी काकांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा अतिशय थाटामाटात पार पडत आहे. या दिव्यांगांच्या सामुदायिक सोहळ्याच्या वेळी ते आपल्या घरातील एखाद्या लग्नसमारंभा सारखेच जबाबदारी घेऊन तो सुरळीत पार पडण्यासाठी झटत होते. विशेषतः लग्न समारंभासाठी उपस्थित असलेल्या वर्हाड्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी ते आपल्या कुटुंबासह धावपळ करत असत. विवाहित जोडप्यांसोबत एखाद्या फोटोसाठी त्यांना बोलावून आणावे लागत असे.अशाच प्रकारे संस्थेच्या गोड दिवाळी, स्वयंरोजगार शिबिर, पेन्शन योजना, आरोग्य शिबिर,विद्यार्थी शैक्षणिक साहित्य वाटप, वर्धापन दिन कार्यक्रम आदी उपक्रमांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या अचानक एक्झिटमुळे "दिव्यांगांचा एक आधारवड हरपला" अशी भावना जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्त करत आहेत.
         खरं पाहता, चुरी काकांच्या बरोबर माझी ओळख सन 2003 मध्ये झाली. जेव्हा मी सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो, तेव्हा मंडळाच्या कामानिमित्त चुरी काकांशी संबंध आला. त्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क येतच राहिला. ते उत्कृष्ट मार्गदर्शक होते. समाजात अशी माणसे खूप दुर्मिळ असतात. गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, लहान-मोठा अशी दरी त्यांना मान्य नव्हती. त्यांनी आपलं उभे आयुष्य सामान्यांच्या  सेवेसाठी वेचले. सामान्यांचे ते कैवारी होते.
         त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, मुलगा संतोष आणि विवाहित कन्या असा परिवार आहे. चुरी काकांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात वंदेमातरम परिवार सहभागी आहे.
    त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 


Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...