गरिबीवर रडण्यापेक्षा गरिबीच्या उरावर नाचून श्रीमंत होता आलं की जगाच्या दृष्टीने तो ‘मोठा माणूस’ ठरतो. आर्थिक गरिबीच्या न्यूनगंडाची धुळ झटकून काढली की त्याखाली दडलेली श्रीमंत ऊर्जा प्रज्वलित होते. प्रारंभी सारखे पराभव पचवावे लागतात. शून्यावर शून्य, शून्यावर शून्य, पुन्हा शून्य आणि शून्यांच्या समोरच एक दिवस कष्टाच्या यशाचा आकडा उभा राहतो, मग तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने धनानेच नव्हे, तर विचारानेही कोट्याधीश बनते. तन, मन, बुद्धी खर्ची पडली की, एक दिवस यशाचा उगवितोच. अशीच काहीशी घटना पालघर तालुक्यातील अल्याळी गावात घडलेली आहे.
युनियन बँकेत उपव्यवस्थापक पदावरून आताच सेवानिवृत्त झालेल्या वसंत बाळू वायडा यांची कथा आताच्या घडीला तरुणांना केवळ प्रेरणादायीच नव्हे तर त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरेल. अलीकडे बहुसंख्य तरुणांना एका दिवसात लाखोपती बनण्याची दिव्या स्वप्न पडत असतात. या तरुणांना जास्त मेहनत आणि त्याच बरोबर अधिक वेळ थांबण्याची तयारी नसते. परंतु संयम, चिकाटी आणि दूरदृष्टी असेल तर एक सामान्य कुटुंबातून आलेला माणूस प्रतिकूल परिस्थितीवर सहज मात करून कशा पद्धतीने आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाचे पर्यायाने समाजाचे नाव उज्वल करतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून वायडा यांच्याकडे पाहता येईल. पालघर रेल्वे स्थानकापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अल्याळी गावात वायडा यांचे बालपण गेले. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या भावांची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरच आली. कुटुंबाकडे उत्पन्नाचे कुठल्याही प्रकारचे स्त्रोत नसल्याने कर्मवीर भाऊराव पाटलांच्या "कमवा आणि शिका" या उक्तीप्रमाणे शिक्षण सुरु असतानाच ते अर्धवेळ मजुरी करून दोन पैसे कमावत होते. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असताना सुरुवातीला पायी तर त्यानंतर एका पारशाच्या वाडी मध्ये अर्धवेळ काम करत असताना त्यांनी दिलेल्या सायकलने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण होताच युनियन बँक आणि त्याचबरोबर एयर इंडियातून नोकरीसाठी त्यांना कॉल आले. कुठल्याही प्रकारचा विचार न करता बँकेतील नोकरीला प्राधान्य देऊन त्या नोकरीत दाखल झाले. त्यांनी नोकरीची सुरुवातीची सहा वर्ष गुजरात मधील जामनगर येथे काढली. त्या काळात मुंबई - गुजरातला जाणाऱ्या ट्रेनची सुविधा जास्त प्रमाणात उपलब्ध नसल्याने सकाळी सौराष्ट्र मेलने कामावर जायचे आणि रात्री येताना लोकशक्तीतीने उशिरा घरी पोचायचे असा त्यांचा दिनक्रम सूरु होता. त्यानंतर त्यांची मुंबई येथे बदली झाली. सुमारे 36 वर्ष त्यांनी सेवा केली.
चांगली नोकरी असल्याने त्यांना एखादी सुशिक्षित अथवा नोकरीवाली मुलगीसुद्धा विवाहासाठी मिळाली असती. मात्र असे असतानासुद्धा त्याने गावातील एका अशिक्षित मुलीशी विवाह केला. त्यांच्या मते, आपण अशिक्षित मुलीशी विवाह केला तर त्या मुलीला चांगलं घडवू शकू. एका अशिक्षित मुलीला सुशिक्षित बनवू ही त्यामागील त्यांची भावना होती. लग्नानंतर श्रुतिका आणि नीतिका या दोघी जुळ्या मुली झाल्या. मुलाच्या अपेक्षेने अनिता आणि नमिता या मुली झाल्या. मात्र ह्या चारही मुलींना मुलांपेक्षा कमी न मानता त्यांना योग्य शिक्षण देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार केले. चारही मुलींनी घरातील, शेतीची कामं करून आपलं शिक्षण पूर्ण केलं. पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेल्या.नितीका ही मुलगी 2011 ला बँकेची परीक्षा देऊन आज पंजाब नॅशनल बँकेच्या ऑफिसर ह्या पदावर कार्यरत आहे. अनिता महाराष्ट्र विद्युत वितरण मध्ये बांद्रा मुख्य कार्यालयात लिपिक ह्या पदावर कार्यरत आहे. श्रुतिका ही आताच इंडिया पोस्ट मध्ये तिन्ही परीक्षा पास होऊन सहाय्यक पदावर सांताक्रूझ येथे रुजू झाली आहे. या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये तिने विशेष प्राविण्य मिळवले होते. तर सर्वात लहान मुलगी नमिता ही सध्या विज्ञान शाखेमध्ये पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालय शिक्षण घेत आहे. मुलीच आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता वंशाचा दिवा म्हणून त्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांना स्पर्धात्मक परीक्षेला बसवून चांगल्या नोकऱ्या मिळवून आदिवासी समाजामध्ये एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. निश्चितच त्यांचेे हे उदाहरण भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल.
आकाशातला एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा,
एक छोटे जग प्रत्येका जवळ असावे,
जगाच्या या गर्दित कुणीच एकटे नसावे.....
क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.
आपल्या रक्तातच धमक असॆल,
तर जगंही जिंकता यॆतं.
आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.
असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हा ही
क्षितीजांच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी.......!
-----------------------------------------------------------------
- प्रमोद पाटील
पालघर
9049052555
सुंदर, अप्रतिम
ReplyDeleteअगदी खरं , छान 👌
ReplyDelete