गेल्या मार्च महिन्यापासून देशात पर्यायाने महाराष्ट्र राज्यात लॉक डाऊन सुरू असल्याने शाळा बंद आहेत. सध्या जरी मे महिना असला तरी ही मे महिन्याची उन्हाळी सुट्टी न वाटता कोरोनाची सुट्टी वाटते. नुसत्या शाळाच बंद नाहीत तर जवळ जवळ सर्वच बंद असल्याने लॉक डाऊनमुळे घराबाहेर पडणे कठीण झालं आहे. अशा या कालावधीमध्ये आपण काय करावं? असा प्रश्न काहींच्या पुढे निर्माण झाला असला तरी पालघर जिल्ह्यातील कला शिक्षकांनी मात्र या संधीचं सोनं केलं आहे.
गत 58 दिवसांमध्ये पालघर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर माळी, चित्रसेन पागधरे, भास्कर खेडकर, विनय पाटील, रुपेश वझे, रवींद्र बागे आदी कला शिक्षकांनी प्रथमतः कोरोना अर्थात covid-19 बाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासन करत असलेल्या गोष्टी वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे अत्यंत मोलाचे काम केले. यापैकी बरीच चित्रे वर्तमानपत्रांतून प्रसिद्धही झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात या शिक्षकांनी पालघर जिल्ह्यातील शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाणारे कै.स.तु.कदम साहेबांचे व्यक्तिचित्र रेखाटून गत स्मृतींना उजाळा दिला. लॉक डाऊनच्या या आत्मपरीक्षणाच्या काळात त्यांना आदरांजली वाहिली. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या काही व्यक्तिरेखा सुद्धा अत्यंत सुंदरपणे रेखाटल्या आहेत, अजूनही दररोज रेखाटत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे या चित्रांबरोबरच अनेक कला शिक्षकांनी सुंदर फलक लेखन करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. तर मनोर येथील सेवानिवृत्त शिक्षक शरद महाजन यांनी ह्या कठीण कालावधीत हातावर पोट असलेल्या सामान्य लोकांच्या भावना, पोलीस, आरोग्य यंत्रणा त्याचबरोबर इतर सरकारी यंत्रणा कोरोनाच्या या लढाईत कशा पद्धतीने लढत आहे यांची व्यंगचित्र काढून जनजगृती बरोबरच समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. महेंद्र पाटील या कला शिक्षकांने कोरोनाच्या अवघड परिस्थितीत "माणसाने माणसाशी माणसा सम वागणे" हा संदेश देणारी तसेच इतर जनजागृती करणाऱ्या कविता करून लोकांची मने जिंकली आहेत. हे सर्व शिक्षक पालघर जिल्ह्यातील कलारत्ने आहेत. अशा कला रत्नांचा आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे.
काही दिवसांपूर्वी मानसोपचार तज्ञ स्मिता अभ्यंकर यांचा सोशल मीडियावर आलेला एक लेख वाचला. या लेखामध्ये त्यांनी मानसशास्त्रामध्ये "फ्लुईड इंटेलिजन्स" नावाची एक संकल्पना असल्याचे सांगितले आहे. फ्लुईड इंटेलिजन्स म्हणजे बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक परिस्थितीनुरूप स्वतःला यशस्वीपणे घडवण्याची तगून राहण्याची क्षमता.आज सगळे जग कोरोनाच्या विळख्यात असताना आपणा भारतीयांसाठी हा "फ्लुईड इंटेलिजन्स" अतिशय महत्वाचा ठरतोय. इतर अनेक देशांनी या परिस्थितीसमोर सपशेल गुडघे टेकले आहेत, भारत मात्र अजूनही ठामपणे पाय रोवून उभा आहे. आपल्या सरकारी यंत्रणा, पोलीस, वैद्यकीय सेवा ह्या सगळ्यांनी दाखवलेलं धैर्य असामान्य आहेच. त्याचा निश््चितच आपल्याला अभिमान आहे. पण ह्या सगळ्यां मागे भारतीय समाज खंबीरपणे उभा आहे. हे काही कमी नाही. याची दखल साऱ्या जगाने घेतली आहे.
लॉकडाउन सुरू होऊन 58 दिवस झाले. आता तर हा कालावधी अजून वाढलाय. अजूनही तो वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण आपण सगळे शांत आहोत. एकमेकाला धरून आहोत. जमेल तसे रोजचे व्यवहार करतोय, जे करू शकत नाही तिथे पर्याय शोधतोय. आपण आपल्या भावना दडपून ठेवलेल्या नाहीत, आपण फक्त त्यांना आवरून धरलंय. गेल्या कित्येक दिवसांपासून जिल्ह्यातील कला शिक्षकांनी दाखवलेली आपले कौशल्य हे याचेच प्रतीक म्हणता येईल. आपला संयम, मनोधैर्य आणि विजिगिषु वृत्ती ही ओढून ताणून आणलेली नाही. तो आपल्या मानसिक यंत्रणेचा एक अविभाज्य घटक आहे आणि त्यामुळेच आपण याही संकटातून तरून जाऊ असा विश्वास माझ्याबरोबरच आपणा सर्वांना आहे.
शाळा कधी उघडतील? पुढील शैक्षणिक वर्ष कसे असेल? दहावी- बारावीचे निकाल कधी लागतील? आदी असंख्य प्रश्न आपल्या मनात आहेतच. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला यथावकाश मिळतीलच. तोपर्यंत आपल्याला मिळालेल्या वेळेचा आपण योग्य तो सदुपयोग करू.
घरीच राहू, सुरक्षित राहू.!
धन्यवाद!
आपला
-प्रमोद पाटील, पालघर
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक
Good job sir
ReplyDelete