पालघर, प्रमोद पाटील
लॉकडाऊन नंतरच्या शालेय शिक्षणात शारीरिक शिक्षणाचे महत्व व शारीरिक शिक्षण शिक्षकाची भूमिका या संदर्भात महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाने सहयोगी शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनांच्या मदतीने राज्यातील सातही विभागाचे शिक्षक आमदार व पदवीधर आमदारांसोबत ऑनलाईन बैठकीचे रविवार (ता. 24 ) आयोजन करण्यात आले होते.
क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिक्षक आमदारानी मार्गदर्शन करताना म्हटले की, बदलत्या तंत्रशिक्षणाच्या युगात व कोरोनानंतर विद्यार्थ्यांची शारीरिक सुदृढता महत्वाची असून शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढ करण्याचे काम क्रीडा शिक्षकांच्या माध्यमातून होणार असल्याचे मत कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी मांडले. कोरोनानंतर शाळा उघडल्यावर विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांची संख्या वाढवावी लागेल. याबाबतीत दोन दिवसांपूर्वीच शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत एक सभा झाली असल्याचे असे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सांगितले. संचमान्यतेत शारीरिक शिक्षण शिक्षकास घेण्यास प्रथम प्राधान्य देऊ असे आमदार दत्तात्रय सावंत यांनी सांगितले. संचमान्यता व त्यासंबंधी शासन निर्णय रद्द होण्याची गरज आमदार नागो गाणार यांनी सांगितली . शारीरिक शिक्षण भरती, संच मान्यता, 6 ते 8 चा शारीरिक शिक्षणाचा कार्यभार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा संबंधी आमदार विक्रम काळे, आमदार किशोर दराडे, आमदार डॉ
. सुधीर तांबे, आमदार श्रीकांत देशमुख यांनी परखड विचार मांडून शिक्षण मंत्र्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले .
या बैठकीत राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, विश्वनाथ पाटोळे, शिवदत्त ढवळे, ज्ञानेश काळे, पद्मश्री प्रभाकररावजी वैद्य, माधुरी चेंडके, प्राचार्य गोरक्षनाथ पारगावकर, डॉ. पुरुषोत्तम उपर्वट, आनंद पवार, राजेश जाधव, डॉ. अरूण खोडस्कर या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या प्रश्नाची जाणीव सभेस करून देत विद्यार्थ्यांच्या प्रतिकारक्षमता वाढीसाठी शाळे वेळेव्यतिरीक्तही अतिरीक्त काम करण्याची तयारी दर्शविली. या बैठकीस राज्यातील एक हजार शारीरिक शिक्षण शिक्षक, पदाधिकारी, शिवछत्रपती पुरस्कारार्थी, राज्य आदर्श आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी उपस्थित होते.
या बैठकीच्या नियोजनासाठी प्रमोद पाटील, जितेंद्र लिंबकर, सचिन पाटील, दिनेश भालेराव, सचिन देशमुख, राजेश जाधव, आनंद पवार यांनी मेहनत घेतली.
या बैठकीस राज्य क्रीडा शिक्षक महासंघ अ. नगर, शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती, माध्य. व उच्च माध्य. शा. शि. महामंडळ, क्रीडा विकास परिषद, क्रीडा संघर्ष समिती, क्रीडाभारती, मुंबई महानगर शा. शि. शिक्षक युनीट, शा. शि. विषय बचाव व कृती समिती, शा. शि. व क्रीडा विषय समिती व सर्व सहयोगी संघटनाचे सदस्य हजर होते. शालेय शिक्षणात शारीरिक शिक्षण विषयाला या सभेमुळे विशेष महत्त्व प्राप्त होण्याची भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली.
चौकटीत-
गेल्या काही दिवसापूर्वी कर्नाटक राज्यातील शालेय शिक्षणाचे वेळापत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या वेळापत्रकामध्ये शारीरिक शिक्षणाच्या व कला विषयाच्या तासिका कमी करण्यात आल्या होत्या. जर असेच वेळापत्रक राज्यात लागू केले तर अनेक क्रीडा व कला शिक्षक अतिरिक्त होतील. त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणात शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांच्या अहर्तेचा उल्लेख नसल्याने राज्यातील कला व क्रीडा शिक्षक कमालीचे हैराण झाले आहेत. रविवारी झालेल्या ऑनलाईन मीटिंगमध्ये सुमारे एक हजार पेक्षा जास्त शारीरिक शिक्षण शिक्षकांनी उपस्थिती लावून ऐतिहासिक सहभाग घेतला.
- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment