लॉकडाऊनचे 21 दिवस...
- प्रमोद पाटील, पालघर
गेल्या काही दिवसांपासून लॉक डाऊन, क्वोरंटाइन, आयसोलेशन, वर्क फ्रॉम होम, लर्न फ्रॉम होम, कोविद 19, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, मास्क, सेनिटायझर, सोशल डिस्टन्ससिंग, काॅन्ट्राक्ट ट्रेसिंग, कन्टेन्टमेंट झोन, बफर झोन, हॉटस्पॉट आदी दैनंदिन व्यवहारात तसे फारसे वापरात नसलेल्या शब्दांचा कानावर अगदीच दिवसभर भडिमार होत होता. यामुळे धर्म, जात, पात, श्रीमंत-गरीब हा भेदभाव बाजूला ठेवून सर्व "लोक माणुसकी हाच धर्म" या उद्देशानं एकमेकांकडे बघू लागले.
अलीकडे मोठ- मोठ्या उद्योजक, राजकारण्यांपासून अगदीच सामान्य माणसा पर्यंत प्रत्येकाचे जीवन खुपच बीझी झालंय. प्रत्येकाला सकाळ पासून रात्री पर्यंत थोडीशी उसंत मिळाली तर नशीब. दिवसभर माणूस धावा-धाव करताना दिसतो. आपण एक शिक्षक. शाळा संपली की इतर सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात कसा वेळ जातो तेच कळेना. सकाळी पाच वाजता उठायचे दिवसभर इथे धाव तिथे धाव करायचं, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करायचं हे करता करता रात्रीचे अकरा कसे वाजतात तेच कळेना.
सुरुवातीला केवळ चीन सारख्या देशात मर्यादित असलेली कोरोनाची साथ फेब्रुवारी महिन्यापासून इटली, अमेरिका, स्पेन आदी जगभरातील प्रगत देशात पसरली. आपल्या देशात ही या साथीने हा- हा करता प्रवेश केला. 4 मार्च रोजी आपल्या देशात पहिला कोरोना बळी सापडला. मानवजातीचा साथीच्या आजारांचा आजवरचा इतिहास पाहता, या साथींवर ताबा मिळवण्यासाठी साधारण एखाद वर्षाचाही कालवधी लागू शकतो. कोरोनासारखे साथीचे आजार केवळ माणसाच्या शरीरावरच हल्ला करतात असे नाही, तर ते समाज जीवनाच्या विविध महत्वाच्या क्षेत्रांवरही प्रभाव टाकून जातात हे मात्र विसरता कामा नये.
भारतात पर्यायाने महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ लागताच केंद्र आणि राज्य सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले. या वेळी 14 मार्च 2020 रोजी राज्य सरकारने राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र राज्य शासनाच्या आदेशाचे आपल्या परीने प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ काढला. यामुळे आठवडाभर विद्यार्थी नसतानाही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळेत उपस्थित रहावे लागले. मात्र तदनंतर शासनाने 20 मार्च रोजी एक आदेश काढून वर्क फ्राॅम होम या तत्वावर प्रथम 31 मार्च पर्यंत काम करावे असे आदेश दिले. याच आदेशात इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा बाबतीत 15 एप्रिल नंतर निर्णय घेतला जाईल असे नमूद केले होते. या दरम्यान शासनाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला गेला. 3 मार्च पासून सुरु असलेली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता दहावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार 23 मार्चला संपणार होती. मात्र 21 मार्च रोजी शासनाने इयत्ता दहावीचा नियोजित 23 मार्च रोजी होणारा भूगोल विषयायाचा पेपर सुरूवातीला 31 मार्च पर्यंत पुढे ढकळला. तर नंतर पुढील आदेश येई पर्यंत पुढे ढकलण्यात आला. तर नंतर तो पेपर रद्दच करण्यात आला. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी देशात सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फू लागू केला. हा जनता कर्फू रात्री आठ वाजता संपत नाही तोपर्यंत राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापनेचे 144 कलम लावले. म्हणजेच 31 मार्च पर्यंत पाच पेक्षा जास्त लोकांना जमण्यास प्रतिबंध करण्यात आला. साहजिकच आत्ता कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम होणार नव्हते . एक विशेष म्हणजे जनता कर्फूच्या कालावधीत कोणीही घरा बाहेर पडायचं नव्हते. जनतेने अगदीच मनापासून जनता कर्फ्यूचे पालन केले. याच दिवशी माझा मोठा मुलगा श्रेयस याचा अठरावा वाढदिवस होता. आमचं तसे एकत्र कुटुंब. घरात 15/20 माणसं. माझ्या भावाच्या पत्नीने घरीच छान केक बनवला. केक कापून वाढदिवस अगदीच साध्या पद्धतीने घरीच साजरा करण्यात आला.
शाळा बंद असल्याने घरून काम करायचे असल्याने, रोजचे काम नाही याचा सुरुवातीला आनंद वाटू शकतो पण एका मर्यादेनंतर ते देखील कंटाळवाणे होऊ लागते. अशावेळी अचानकपणे उपलब्ध झालेल्या या वेळेचा उपयोग आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, काही नवीन छंद जोपासण्यासाठी करता आला. आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या सर्वांचा उपयोग होतो. हे सर्व लक्षात आल्यावर काही वर्षापूर्वीचे ते दिवस आठवले. 1998 मध्ये मी, माझा भाऊ आणि काकांची दोन लहान मुलं असा परिवार पालघर येथे राहायला आलो. त्याकाळात घरातील स्वयंपाका पासून कपडे धुणे, लादी पुसणे, घरातील इतर साफसफाई करणे आदी कामं आम्ही करत असू. अगदी तीन-चार वर्षे लग्न होईपर्यंत हे काम नियमित सुरू होते. लग्नानंतर मात्र बराच गॅप पडला. लॉक डाऊन मुळे ही कामे करण्याची संधी मिळाली. मुलांबरोबर कॅरम, बॅडमिंटन खेळता आले.या पूर्वी सुरू केलेल्या आणि अपूर्ण असलेल्या लिखाणाला पुन्हा जोमाने सुरूवात केली.
या पूर्वी आपल्या देशात आलेल्या प्लेग किंवा देवी या साथीच्या रोगांबद्दल ऐकलं होतं. आपण लहान असताना देवीचा "रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा" अशा घोषवाक्यांनी ग्रामीण भागातील सार्वजनिक भिंती रंगवलेल्या बघितल्या असतीलच. सन 1897 मध्ये म्हणे प्लेगच्या साथीने महामारी झाली होती. गावंच्या गावं गेली होती असे ऐकले होते, वाचले होते. त्या तुलनेत कोरोना जरा जास्तच वरचढच दिसतो. एक विशेष बाब म्हणजे या साथीला सामोरे जायला आजचे जग खूपच अधिक सक्षम जरी वाटत असले तरीसुद्धा सर्वांनी या संसर्गा पुढे गुडघे टेकले. कोरोनासारख्या साथीच्या रोगांची संकटे मानवी मनाला अस्वस्थ करून घाबरून टाकतात हे जरी खरे असले तरी, मानवी मनातील "स्वत:पलीकडे बघण्याच्या भावनेलाही" ती जागृत करत असतात. प्लेगच्या साथीमध्ये लोकांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुलेंना मृत्यू आला होता. कोरोनाचा सामना करणाऱ्या काही आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे प्रसंगही घडत आहेत.आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या व्यक्तींना या कालखंडात अधिक ताणाला सामोरे जावे लागते. रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना या आजाराची लागण होण्याची शक्यताही अधिक असते. याचा ताण त्यांच्या स्वत:वर प्रकृतीवर आणि कुटुंबियांवर पडतो. अशावेळी त्यांना भावनिक आधार देणे; त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे देखील समाज म्हणून आपले कर्तव्यच आहे. मानसिक पातळीवर या साथीकडे संकट म्हणून बघायचे की धीराने आणि विचारपूर्वक सामोरे जायचे, हे प्रत्येकाने स्वत:शी आणि समाज म्हणून आपण सर्वांनी ठरवण्याची हीच वेळ आहे. आणि म्हणूनच संपूर्ण देशात सर्वांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्या प्रमाणे रविवारी (22 मार्चला) टाळया, घंटानाद घरातच करून या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणारया डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देणारे अधिकारी आदी सर्व घटकांपोटी कृतज्ञता व्यक्त केली. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना अचानक डोळ्यांच्या पापण्या कधी ओल्या झाल्या हे सुद्धा कळले नाही. जनतेने सेवा देणारयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मात्र काही महाभागानी पंतप्रधानांनी सांगितलेल्या गोष्टी न करता सोशल डिस्टन्सिग न पाळता वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य, साहित्य घेऊन रस्त्यावर धुमाकूळ घातला. काय म्हणावं अशा या राक्षशी प्रवृत्तीला ?
एक गोष्ट आवर्जून येथे उल्लेख करावी लागेल की, कोरोना विषाणूचा फैलाव साधारणपणे जानेवारी महिन्यात परदेशात झाला. हळूहळू या रोगाने बाळसं घेत तो नंतरं काही देशात दुडू - दुडू धाऊ लागला.परदेशात असलेला हा रोग भारतात कधी आला ते कळलं सुद्धा नाही.परदेशात असलेल्या काही भारतीयांनी हे सर्व जवळून बघितलं-अनुभवलं. इटली सारख्या छोट्या परंतु प्रगत देशात या रोगावर जर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले तर भारतात जर हा रोग पसरला तर किती मोठा अनर्थ होईल याचे विश्लेषण बरयाच परदेशात असलेल्या भारतीयांनी सोशल मिडियाचा माध्यमातून केलं. असे जरी असले तरीसुद्धा आपल्या देशातील बहुतांश लोकांच्या अंतर्मनात या रोगाबद्दल गांभीर्य काही बिंबेना. शेवटी शासनाला वेगवेगळ्या प्रकारचे आदेश काढावे लागले. कोरोनाचा होत असलेल्या फैलावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चच्या रात्री बारा वाजेपासून म्हणजेच 25 मार्च पासून 21 दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली. म्हणजे 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात कर्फू लावण्यात आला. संपूर्ण देशभर लॉक डाऊन करण्यात आले. या लॉक डाऊन कालावधीमध्ये विमानसेवा, रेल्वेसेवा, बससेवा, सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे, शासकीय कार्यालये, मंदिरे, मस्जिदी, चर्च, दर्गे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, माॅल, हाॅटेल्स , जिम्स, स्विमिंग टँक्स, दुकाने, खाजगी बस, टॅक्सी, रिक्षा,शाळा, महाविद्यालये, विविध कंपन्या आदी सेवा बंद करण्यात आल्या. परीक्षा, लग्नसोहळे, सार्वत्रिक निवडणुका कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले.शहारां बरोबरच गावातील लोक जागृत झाले. बरयाच गावांनी गावातील लोकांनी बाहेर जाऊ नये आणि बाहेरच्या लोकांनी गावात येऊ नये म्हणून फलक लाऊन वेशी बंद केल्या. कारण कोरोना हा अतिशय संसर्गजन्य रोग असल्याने आणि त्यावर योग्य औषधोपचार उपलब्ध नसल्याने लोकांची भिती रास्तच होती. सोशल मिडियावर दररोज येत असलेल्या बातम्या आणि कोरोनाचे देशात, राज्यात आणि पालघर जिल्हयात वाढत असलेले रुग्ण यामुळे आत्ता पर्यंत हवेत असलेल्यांचे पाय जमिनीवर कधी आले ते सुद्धा कळले नाही. नियतीने ब्रेक लावला होता. श्रीमंत आणि गरीब, जात, धर्म, वंश, लिंग हि दरीच या रोगाने कमी केली. आणि या भूतलावावर फक्त मानव हीच एकमेव जात असल्याचे सिध्द झाले. गर्वाचे घर खाली आले.
21 दिवसांचा लॉक डाऊन सुरू असतानाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सोशल मीडिया वरून सातत्याने आवाहन सुरू होते. 3 एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान मोदी यांनी एका व्हिडीओ च्या माध्यमातून देशातील 135 कोटी जनतेला 5 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे पणत्या किंवा दिवे लावण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांच्या आवाहनाला देशातील जनतेने अगदीच भरघोस प्रतिसाद दिला. ठीक-ठिकाणी दिवे, पणत्या उजळले गेले. मात्र या वेळीही "वेड्यांची जत्रा आणि खुळ्यांचा बाजार".. याचा प्रत्यय आला. याहीवेळी पंतप्रधानांनी सांगितलेल्या गोष्टींचा वेगळा अर्थ लावून काही महारथींनीं मशाली हातात घेऊन रस्त्यावर उतरले. तर काहिनी फटाके फोडून दिवाळी साजरी केली. असे असले तरी एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली संकटाच्या काळातहीं सर्व भारतीयांनी एकी दाखवली. मुळातच हे ऐक्याचे दिवे होते. आलेल्या संकटावर मात करण्याचे दिवे होते.
लाॅकडाऊन चे पहिले 21 दिवस हळूहळू कमी होत होते. देशातील सामान्य माणसापासून मोठ्या उद्योजक, राजकारणी माणसांना सुद्धा प्रतिक्षा होती ती 21 दिवसांच्या लाॅकडाऊन पूर्ण होण्याची. मात्र देशात विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढतच होते. आणि अशातच 11 एप्रिलला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ मिटींग घेतली. या मिटींगमध्ये सर्व देशाचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांनी 14 एप्रिलला संपणारया लाॅकडाऊनची तारीख वाढवून 3 मे केली. म्हणजे पुन्हा 19 दिवसांचा लाॅकडाऊन. आत्ता मात्र हातावर पोट असणारया लोकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली. "ना घरात राहता येत, ना बाहेर जाता येईना". या दरम्यान अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांचा माध्यमातून गोर गरीबांना अन्न धान्य वाटप सुरू होते.असे जरी असले तरी बरयाच जणांपर्यंत ते पोचत नव्हते.एकीकडे कोरोनाची भिती तर दुसरीकडे पोटाची चिंता माणसाला अवस्थ करू लागली.विषाणू नियंत्रणात आल्यावर सर्व व्यवस्था हळूहळू पूर्वपदावर लवकरच येईल. यासाठी आपण सर्व खूप कष्ट करून आपल्या देशाला नव्या दमाने उभारणीसाठी जीवाची बाजी लाऊ आणि आपला देश पुन्हा "सुजलाम-सुफलाम" करू!.
धन्यवाद!
- प्रमोद भालचंद्र पाटील
9049052555
(माध्यमिक विभाग)
-अभिनव विद्यालय विराथन,
तालुका- जिल्हा पालघर.
Comments
Post a Comment