मातृभाषेतूनच प्रभावी शिक्षण: प्रमोद पाटील यांचे प्रतिपादन, दातीवरे येथे विज्ञान प्रदर्शनाचे शानदार आयोजन
पालघर- परदेशातही आपापल्या भाषेतील शिक्षणाला प्राधान्य दिले जात असून आपल्या देशात मात्र आपण इंग्रजी माध्यमाचा अति आग्रह धरून अतिरेक तर करत नाही ना ? असा सवाल उपस्थित करून मातृभाषेेेतूनच शिक्षण महत्वाचे आहे असेे प्रतिपादन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील यांनी केले आहे.
दातिवरे शिक्षण संस्थेच्या दातिवरे इंग्लिश हायस्कूल मध्ये मंगळवारी (ता. 17) आयोजित विज्ञान,चित्र व हस्तकला तसेच ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या पाटील यांनी आपण नुकताच इंडोनेशिया येथील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेला उपस्थित राहून तेथील शैक्षणिक पध्दती आत्मसात केली असता परदेशातील शाळांमध्ये दिवसांतून तीन वेळा गायत्री मंत्र आजही म्हटला जातो , तेथील शाळांमध्ये आरोग्य केंद्र उपलब्ध आहेत असे सांगून विद्यार्थ्यांच्या मनातील वैज्ञानिक जिज्ञासा वाढीस लागावी, त्यांच्या मनात विज्ञानविषयक कुतूहल निर्माण व्हावे, शाळेत शिकवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वैज्ञानिक संकल्पना सहज स्पष्ट होण्यासाठी विज्ञान प्रदर्शन हे महत्वाची भूमिका पार पाडत असते असे सांगून प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या विज्ञान व विविध कला प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी इंधनाला पर्याय म्हणून विजेचा वापर करून बनविलेली बोट, पाण्याचा सदूपयोग, रेन वाॅटर हार्वेस्टींग आदी प्रकल्प होते.तर चित्रकला व रांगोळीच्या माध्यमातून मुलगी वाचवा हा संदेश देण्यात आला. तसेच तंबाखू मुक्त शाळा हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी हिरिरीने भाग घेतला. तर शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्यातून गणितीय गंमती जमती विद्यार्थ्यांना आकर्षित करून घेत होत्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष दातिवरे शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष जगन्नाथ वर्तक होते. वर्तक यांनी विविध कला कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला वेगवेगळे पैलू पडत असून एक आदर्श व्यक्ती घडते. विद्यार्थ्यांना योग्य संधी उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावतात असे सांगून शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष हेमंत ठाकूर, दातीवरे सरपंच ज्योती तामोरे, शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम राठोड, शिक्षक, ग्राम पंचायत सदस्य, आजी माजी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रदर्शनाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम राठोड यांनी तर सूत्रसंचालन विज्ञान शिक्षक सुशिल ठाकूर यांनी केले.
Comments
Post a Comment