इंडोनेशिया येथील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कॉन्फरन्समध्ये राज्यातील शिक्षकांनी घडविले भारतीय शिक्षण व संस्कृतीचे दर्शन
येथील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कॉन्फरन्समध्ये राज्यातील शिक्षकांनी घडविले भारतीय शिक्षण व संस्कृतीचे दर्शन
पालघर-
महाराष्ट्र राज्यातील सुमारे 30 उपक्रमशील शिक्षक, मुख्याध्यापक व नृत्य कलाकार विद्यार्थ्यांनी इंडोनेशिया देशातील बाली येथे शुक्रवारी (ता. 22) झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक कॉन्फरन्समध्ये आपले विविध कौशल्य दाखवून भारतीय तिरंगा इंडोनेशियामध्ये अभिमानाने फडकविला.
जागतिक पर्यटनाचे केंद्र असलेल्या बाली येथील कुता(बडुंग) एसएमपीएन या ठिकाणी संपन्न झालेल्या या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक कॉन्फरन्स मध्ये राज्यातील शिक्षकांनी आपल्याकडील शोधनिबंध व विविध कौशल्य सादर केले. यामध्ये पालघर जिल्हयातील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील यांनी भारतीय संस्कृती आणि शैक्षणिक पद्धती या विषयावर पाॅवर पाॅईंट प्रझेंटेशन करून जगात भारतीय संस्कृती किती महत्वाची आहे हे विशद करून भारतीय प्राचीन व आधुनिक शिक्षण पद्धती यांची एकमेकांशी असलेले संबंध स्पष्ट केले. तसेच भारतातील विद्यमान शिक्षण पद्धतीचे सादरीकरण केले. तर पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालिका तथा स्व. विद्या विनोद अधिकारी विद्यालय लालोंडे येथील प्रगती पाटील यांनी परंपरागत कठपुतलीच्या शोमध्ये सहभागी होऊन भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.
तसेच या परिषदेत आपल्याकडील कला संस्कृतीचे दर्शन डोंबिवलीतील नृत्यम संस्थेच्या संचालिका भरत नाट्यम विशारद स्वप्ना देशपांडे, इद़धनू आर्ट अॅकेडमीच्या किर्ती निर्गुण व सहकारी तर रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण येथील नृत्य मल्हार कथक अॅकेडमीच्या कथक नृत्याविशारद स्कंधा (आर्या) चितळे व चिपळूण तेथील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनींनी रामायण व इतर विविध कार्यक्रमांच्या अप्रतिम सादरीकरणाबरोबरच डोंबिवलीच्या मुख्याध्यापिका कल्पना गवरे यांनी परंपरागत कठपुतलीच्या शो आणि शिक्षण तज्ञ मारूती गोंधळी यांनी वेगवेगळे आवाज काढून उपस्थितांची वाहवा मिळवली.
राज्यातील शिक्षकांनी 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या दरम्यान इंडोनेशियातील वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून इंडोनेशियामधील शैक्षणिक, अध्यापन पद्धती समजून घेतली. तसेच आपल्याकडील शैक्षणिक पद्धती आणि विचारांचे आदान प्रदान केले.
इंडोनेशिया मधील बाली हे बेट पर्यटनाच्या दृष्टीने सुप्रसिद्ध आहे. रामायणाची आणि महाभारताची पार्श्वभूमी व संस्कृती या बाली बेटाला आहे. त्याकाळातील संस्कृती आणि परंपरा आजही येथे जोपासली जात आहे. अनेक हिंदू मंदिरे या ठिकाणी असून तसेच बाली हे नाव रामायणा मुळे पडले आहे. बाली हा सुग्रीवाचा भाऊ आपण रामायणामध्ये ऐकलेले आहे.या रामायणाचे प्रयोग येथे सुरू असून राज्यातील शिक्षकांनी हे प्रयोग पाहिले.
या परिषदेला पालघर जिल्हयातील विराथन येथील अभिनव विद्यालयातील शिक्षक तथा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील, पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालिका तथा विद्या विनोद अधिकारी विद्यालय लालोंडे येथील प्रगती पाटील उपस्थित राहून कठपुतलींवर आधारित पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
तसेच कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक मारूती गोंधळी, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सहसचिव ज्ञानेश्वर म्हात्रे, क्रॉसवेचे इंटरनॅशनलचे संचालक दिलिप ठाणेकर, सिनेकलाकार स्वप्निल फडके, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पवार, रमेश जाधव, बाळासाहेब सोनजे, काशीनाथ भोईर, प्रकाश घोडके, लालचंद पाटील, स्नेहलता झेले आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकटीत-
इंडोनेशिया येथील शैक्षणिक परिषदेत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी पुढीलप्रमाणे सादरीकरण केले.
1) प्रमोद पाटील (पालघर)- भारतीय संस्कृती आणि शैक्षणिक पद्धती.
2) उज्ज्वला जगताप( पुणे) - कृतीयुक्त अध्यापन पध्दती
3) प्रधान कुलकर्णी ( ठाणे)- गणितीय गंमती जमती
4) अनिल माळी( नाशिक)- भारतीय पक्षी संवर्धन
5) संजय जगताप ( पुणे)- आय एस ओ स्कूल संकल्पना
6) सलमा अंसारी (भिवंडी)- शालेय गुणवत्ता विकास
7)सुनिल आहेर( नाशिक)- प्लास्टीक प्रदुषण
8) ज्योती तांबे ( पुणे) - आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचा वापर
9) चंदाराणी कुसेकर( ठाणे)-ज्ञानरचनावाद
10) कल्पना गवरे ( डोंबिवली)- कठपुतली शो
11) मनिषा हिवरे ( कसारा)- साहित्यातून शिक्षण
"प्रतिक्रिया"-
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत परदेशातील शिक्षण प्रणाली समजून घेण्यासाठी राज्याचे तत्कालिन शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या संकल्पनेतून परदेशात जाऊन तेथील शिक्षण पद्धती समजावून घेऊन राज्याच्या शैक्षणिक पद्धतीत नवनवीन उपक्रम राबवून राज्याची शिक्षण पद्धती अधिक गतीमान करण्यासाठी निश्चितच अशा परिषदा उपयुक्त ठरतील. शासनाने अशा परिषदांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
- प्रमोद पाटील, पालघर
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक
Comments
Post a Comment