सफाळयातील विराथन बुद्रुक शाळेचे शतक; पालकांनी व्यक्त केलं शाळेविषयी प्रेम!
प्रमोद पाटील
केळवे वार्ताहर ता.13
ज्या शाळेत आपण शिकलो तेथे आता आपली मुलं, नातवंडे शिक्षण घेत आहेत.या शाळेने आता शतक गाठले. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे अशा भावना पालकांनी व्यक्त करीत शाळेविषयी आपली कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केलं. या वेळी बरयाच जणांना आपल्या भावना आवरणेही कठीण झाले होते.
सफाळे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या विराथन बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेचा शतक महोत्सवी सोहळा शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता.13) मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
13 मार्च 1919 रोजी तत्काळीन परिसरातील परिस्थिती लक्षात घेऊन या जिल्हा परिषदेच्या शाळेची स्थापना करण्यात आली.विराथन, विठ्ठलवाडी, चिखलपाडा, जलसार आदी गावांतील विद्यार्थ्यांसाठी विराथन बुद्रुक येथे ही गटशाळा सुरू करण्यात आली.इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या शाळेत परिसरातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असत. समुहगान, वत्कृत्व आणि क्रीडा स्पर्धांमध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांनी विशेष मजल मारली असून शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे.
सद्या या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गात 54 विद्यार्थी शिक्षण घेत असून गेल्या दोन वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थी येथे दाखल होत आहेत असे येथील प्रमुख शिक्षक प्रशांत तरे व सुनिल भरसट यांनी सांगितले.
शतक महोत्सवाचे औचित्य साधून या शाळेत काम केलेल्या शिक्षकांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांसाठी हळदी कुंकु आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी परिसरातील सर्वात जेष्ठ शिक्षक नारायण कारभारी होते.
या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल किणी,सरपंच शरद घरत, केंद्र प्रमुख लुसी डिसोझा, डाॅ.अरूण घरत ,जयवंत महाराज, चंद्रकांत साने, विनायक किणी, दिनकर घरत, प्रदिप घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिष जाधव यांनी तर सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले. तर आयकर अधिकारी ज्योती जाधव आणि अजंली किणी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शाळेचे असंख्य आजी माजी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment