मुंबईतील शिक्षणाच्या वारीत पालघर जिल्हयातील शिक्षक व पालक राहणार उपस्थित
प्रमोद पाटील
केळवे वार्ताहर ता.28
मुंबईतील वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर बुधवार (28) पासून सुरू झालेल्या शिक्षणाच्या वारीत पालघर जिल्हयातील सुमारे 125 शिक्षक आणि 125 शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य येत्या शुक्रवारी (ता. 30) उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या विकासात शिक्षक-पालक दोघांचीही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शाळा व्यवस्थापन समिती ही मुख्यत्वेकरून पालकांचे प्रतिनिधित्व करते. शाळा व्यवस्थापन समिती हा घटक सक्षम झाल्यास शाळा विकासात लोकसमुदायाचा सहभाग अधिक वाढेल. त्यातून शिक्षक-पालक सुसंवाद निर्माण होईल आणि 100 % विद्यार्थी प्रगत करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. या उद्देशाने गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समित्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी यावर्षीची ‘शिक्षणाची वारी’ मुंबई येथे आयोजित केली आहे.
‘शिक्षणाची वारी’चे यंदाचे चौथे वर्ष आहे. आतापर्यंत आयोजित केलेल्या शिक्षणाच्या वारीमध्ये सुमारे लाखभर शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी विविध नाविन्यपूर्ण प्रयोगांचा लाभ घेतला आहे. यापूर्वी पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक आणि रत्नागिरी येथील यशस्वी आयोजनानंतर यावेळी मुंबई, कोल्हापूर, वर्धा, नांदेड आणि जळगाव येथे वारीचे आयोजन करण्यात आले आहे. या टप्प्यातील पहिली वारी मुंबईत एमएमआरडीए मैदान, बीकेसी, वान्द्रे पूर्व येथे दि. 28 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत होत आहे.
मुंबईच्या वारीत रायगड, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षक भेट देणार आहेत. दुपारी 2 नंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व शिक्षणप्रेमींसाठी वारी खुली असणार आहे.
शाळा विकास आराखडा व शाळा व्यवस्थापन समिती संरचना, पालकांची शाळांना अध्यापनात / कौशल्य विकासात मदत, किशोरवयीन आरोग्य शिक्षण, शालेय पटसंख्येत भरीव वाढ होण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, लोकसहभाग, शालेय पोषण आहार, स्थलांतरित व शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समितीचा सहभाग, स्वच्छ भारत-स्वच्छ विद्यालय, दिव्यांग मुलांसाठीचे शिक्षण, गणित व भाषा वाचन विकास, कृतियुक्त विज्ञान, तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर, कला, कार्यानुभव व क्रीडा विषयक उपक्रमांचे प्रयोग येथे मांडण्यात आले आहेत.
चौकटीत-
-दुसरी वारी कोल्हापूर (10 ते 12 डिसेंबर, 2018),
-तिसरी वारी वर्धा ( 3 ते 6 जानेवारी, 2019),
-चौथी वारी नांदेड येथे (29 ते 31 जानेवारी, 2019) आणि -- -पाचवी वारी जळगाव येथे (15 ते 17 फेब्रुवारी, 2019) होणार आहेत.
प्रतिक्रिया-
शिक्षणाच्या वारीत पालघर जिल्हयातील माध्यमिक विभागातील 25 शिक्षक आणि 25 शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तर प्राथमिक विभागातून 100 शिक्षक व 100 शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य येत्या शुक्रवारी उपस्थित राहणार आहेत.
- राजेश कंकाळ - मोहन देसले
प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी
जिल्हा परिषद पालघर
Comments
Post a Comment